लोकमत न्यूज नेटवर्क
सावदा, ता. रावेर : यावल ट्रान्स्पोर्ट युनियन व केळी व्यापारी यांच्यात हमालीवरून गेल्या दोन महिन्यांपासून खदखदत असलेला वाद ट्रान्सपोर्ट युनियन व केळी व्यापारी यांच्या मंगळवारी सकाळी सावदा गोल्डन ट्रान्सपोर्टच्या गोदामात झालेल्या बैठकीत वादावर तोडगा काढत सामोपचाराने मिटवला. केळी उत्पादक शेतकऱ्यांनीदेखील सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. या निर्णयामुळे ट्रान्सपोर्ट चालक मालक व व्यापारी या दोघांचे शेतकऱ्यांचे स्वागत केले आहे.
यावेळी डी. के. महाजन मोठा वाघोदा, निसार चिनावल, गोविंद शेठ महेश शेठ, शेख अल्लाबक्ष शेख नजीर सावदा, अल्लमोद्दिन पटेल लहान वाघोदा, हाजी सैफुद्दीन यावल यासह मोठ्या प्रमाणात व्यापारी तर ट्रान्सपोर्टचालक हाजी शेख हारुन शेख ईब्काल, अजमल पठाण, उपदेश शर्मा उपस्थित होते.
केळी उत्पादक शेतकरी यांना सद्य:स्थितीत चांगले भाव मिळत आहेत. केळी व्यापारी व ट्रान्सपोर्ट चालक यांच्या वादाचा परिणाम केळी भावांवरदेखील जाणवू लागला असल्याने केळी उत्पादक शेतकरी यांना प्रथम दर्शनी ठेवून या वादावर समन्वयातून तोडगा काढण्यात आला आहे, अशी माहिती ट्रान्ससपोर्ट चालक व केळी व्यापारी यांनी सांगितले.
काय होता व्यापारी व ट्रान्सपोर्ट चालक यांच्यातील वाद
पूर्वापारपासून केळीची गाडी भरण्यासाठी दिली जाणारी रक्कम म्हणजे हमाली आणि केळीची गाडी खाली करण्यासाठी दिली जाणारी रक्कम म्हणजे डाला ही ट्रकमालक यांच्याकडून दिली जात होती. परंतु परप्रांतातील व्यापाऱ्यांकडून गाडी खाली करण्यासाठी अव्वाच्या सव्वा पैसे कापत असल्याचा आरोप ट्रान्सपोर्ट युनियनने केला होता व दोघा बाजूंची दोघांनी व्यापाऱ्यांनी द्यावी, अशी मागणी केली होती. त्यामुळेच केळी व्यापारी व ट्रान्सपोर्ट चालक यांच्यात वाद निर्माण झाला होता.
असा मिटला समन्वयातून वाद
ट्रान्सपोर्टचालक यांच्याकडून मागणी करत परप्रांतातील व्यापारी केळी भरून गेलेल्या ट्रकमधील केळी खाली उतरवण्यासाठी अव्वाच्या सव्वा रक्कम आकारत असतात. ती रक्कम दहा चाकी असणाऱ्या ट्रककडून २ हजार रुपये व १२ चाकी असणाऱ्या ट्रककडून अडीच हजार रुपये तर ट्रकमध्ये केळी भरणाऱ्या हमालीसाठी प्रतिटन १३० रुपये असे दर निश्चित करून या वादावर समन्वयातून तोडगा काढला
ट्रान्सपोर्टचालकाकडून ‘जिसका माल उसका हमाल’ अशी रीत सुरू आहे. परंतु केळी वाहतुकीमधील जुनी परंपरा कायम ठेवत ट्रक चालकाकडूनच डाला व हमाली देण्याचे ठरविले आहे.
- शेख हारुन शेख इकबाल, ट्रान्सपोर्ट चालक, सावदा
गेल्या १०० वर्षांपासून हमाली व डाला हे केळी ट्रकचालक देत असून आता नव्याने ट्रान्सपोर्ट चालक यांनी शक्कल लढवत डाला व हमाली व्यापाऱ्यांकडून वसूल करण्यात यावी, अशी मागणी केली होती. त्यामुळेच या बैठकीचे आयोजन करत या बैठकीतून केळी वाहतुकीतील जुनीच परंपरा कायम ठेवण्यात आली आहे.
- बाळकृष्ण साळी, केळी व्यापारी, सावदा