BJP Raksha Khadse ( Marathi News ) : रावेर लोकसभा मतदारसंघातून भाजपने पुन्हा एकदा विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या स्नुषा असलेल्या रक्षा खडसेंवर भाजपने पुन्हा विश्वास दर्शवल्याने राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या. भाजपच्या या अनपेक्षित खेळीमुळे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची कोंडी झाल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र दुसरीकडे रक्षा खडसे यांच्या उमेदवारीवरून भाजपमध्येही अंतर्गत वाद असल्याचं चित्र असून याबाबतचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. भाजप नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत झालेल्या पक्षाच्या बैठकीत काही पदाधिकाऱ्यांनी रक्षा खडसे या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन प्रचारासाठी फिरत असल्याचं सांगत भाजप पदाधिकाऱ्यांकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप केला. या घटनेचा व्हिडिओ समोर आल्याने भाजपमधील वाद चव्हाट्यावर आला असून याबाबत रक्षा खडसे यांनी खुलासाही केला आहे.
भाजप पदाधिकाऱ्यांच्या नाराजीवर बोलताना रक्षा खडसे यांनी म्हटलं आहे की, "आता निवडणूक जाहीर झाली आहे. अशावेळी सर्वच पक्षांमध्ये असे छोटेमोठे वाद होत असतात. मात्र गिरीशभाऊंनी सगळ्यांची बैठक घेऊन समजूत काढली आहे. माझ्या मते हा काही फार मोठा मुद्दा नाही. मात्र हा व्हिडिओ कोणी व्हायरल केला आणि त्यामागे त्यांचा काय उद्देश आहे, हे मला माहीत नाही. मी राष्ट्रवादीच्या लोकांना सोबत घेऊन काम केलं असतं तर पक्षाने उमेदवारीसाठी माझा विचार केला नसता. आम्ही काय करतो, याकडे पक्षाचं लक्ष असतं," असं स्पष्टीकरण रक्षा खडसे यांनी दिलं आहे.
दरम्यान, भाजपचे काही पदाधिकारी बैठकीत रक्षा खडसे यांच्यावर राष्ट्रवादीशी असलेल्या जवळीकीबद्दल आरोप करत असल्याचं व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे. या बैठकीला गिरीश महाजन आणि भाजपचे चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण हेदेखील उपस्थित होते.
रावेर लोकसभेबाबत एकनाथ खडसेंची भूमिका काय?
रावेरमध्ये भाजपकडून रक्षा खडसे यांना उमेदवारी देण्यात आल्यानंतर काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती. "लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी मला डॉक्टरांनी प्रकृतीच्या कारणास्तव परवानगी दिलेली नाही. त्यामुळे मी रावेर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार नाही. तसंच रोहिणी खडसे यांनीही लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत कधीही विचार केला नव्हता. त्या केवळ विधानसभा निवडणूक लढवायची आहे, असा विचार करून मागच्या चार-पाच वर्षांपासून काम करत आहेत. त्यामुळे रोहिणी खडसे यादेखील रावेर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार नाहीत," अशी माहिती एकनाथ खडसे यांच्याकडून देण्यात आली होती.