जळगाव : शहरात विनाकारण फिरणार्या लोकांवर कारवाई करत असताना मनपा उपायुक्त व महिला पोलीस अंमलदार यांच्या शाब्दिक वाद झाल्याची घटना बुधवारी दुपारी अडीच वाजता घडली.
बुधवारी टॉवर चौकात महापालिका व पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांवर संयुक्त कार्यवाही मोहीम राबवली जात होती. याच वेळी महिला पोलीस अंमलदार या चौकात आल्या असता त्यांना मनपा उपायुक्त संतोष वाहुळे यांनी अडविले. आपण पोलीस असल्याचे त्यांनी उपायुक्तांना सांगितले. या अंमलदार महिला गणवेशात नव्हत्या, त्यामुळे वाहुळे यांनी ओळखपत्राची मागणी केली असता महिला अंमलदार ओळखपत्रही सादर करू शकल्या नाहीत. या ठिकाणी ‘इगो’ आडवा आल्याने त्यावरून शाब्दिक वादाला तोंड फुटले. हे प्रकरण शहर पोलीस ठाण्यात गेले, तेथे महिला महिला अंमलदाराने वाहुळेंविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा पवित्रा घेतला. मात्र काही जणांच्या मध्यस्थीने तेथेच प्रकरण मिटविण्यात आले.