नशिराबाद : गटारीच्या सांडपाण्यावरून दोन गटात जोरदार वाद होवून हे प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचल्याचा प्रकार नशिराबाद येथे घडला. हा प्रकार कळताच जिल्हा परिषद उपाध्यक्ष लालचंद पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन रहिवाशांची समजूत घातली. नंतर पक्की गटार बांधून देतो असे आश्वासन देवून तत्काळ तीन लाख रुपयांचा निधी मंजूर करीत कामास सुरवातही केली. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त करीत त्यांचे आभार मानले.नशिराबाद येथील सुसगाव रस्त्यालगत असलेल्या दत्तनगर परिसरातील रहिवाशांचे सांडपाणी गेल्या सात ते आठ वर्षांपासून समर्थ कॉलनीला लागून असलेल्या मुख्य गटारी कडे वाहत होते. या पाण्याला नैसर्गिक उतार त्या दिशेने होता. परंतु, दत्तनगर गटाराचे सांडपाणी दुसऱ्या गटात नको या मानसिकतेतून वाद उदभवला. त्यातच एका गटातील रहिवाशांनी मातीचे डंपर टाकून पाणी बंद करण्याचा प्रयत्न केला. दत्तनगर रहिवाशांनी ग्रामपंचायतीकडे लेखी तक्रार दिली. पण ग्रामपंचायतीच्या प्रशासक व अधिकाऱ्यांनी त्याकडे पाठ फिरवली. परिणामी, रहिवाशांच्या बाथरूममध्ये पाणी तुंबले. पुढे हे प्रकरण पोलिसांपर्यंत ही पोहोचले. पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली व रहिवाश्यांची समजूत घातली. शेवटी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लालचंद पाटील यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी येऊन दत्तनगर वासियांचा सांडपाणी नैसर्गिक उताराकडे जाऊ शकतो. तिथे गटातटाचा वाद नसतो, असे सांगत पाटिल यांनी जिल्हा परिषदेचे बांधकाम विभागाचे इंजिनियर बोलावून मोजमाप केले व तातडीने टेंडर मंजूर करून प्रत्यक्ष कामास सुरुवात केली. गटारीच्या आखणी करण्यात आली असून शुक्रवारपासून कामास प्रत्यक्ष सुरुवात होईल अशी माहिती जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लालचंद पाटील यांनी लोकमतला दिली. गटारीच्या बांधकाम होणार असल्यामुळे शेवटी वादावर पडदा पडला.