जळगाव : घरकुल प्रकरणात दोषी ठरलेल्या पाच विद्यमान नगरसेवकांचा अपात्र करण्याचा ठराव महासभेत बहुमताने मंजूर करण्यात आला असून, या ठरावानुसार संबधित नगरसेवकांना अपात्र करण्यात यावे अशा आशयाचे पत्र मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी बुधवारी जिल्हा न्यायालयात सदर केले आहे. यामुळे नगरसेवकांच्या अपात्रतेप्रकरणात मनपा आयुक्तांनी अखेर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. या प्रकरणात पुढील कामकाज १ जुलै रोजी होणार असल्याची माहिती मनपाचे विधीतज्ज्ञ ॲड.आनंद मुजुमदार यांनी दिली आहे.
महापालिकेतील घरकुल प्रकरणात दोषी ठरलेल्या मनपातील पाच विद्यमान नगरसेवकांच्या अपात्र करण्यासाठी दाखल याचिकेवर बुधवारी जिल्हा न्यायालयात कामकाज झाले. या नगरसेवकांना अपात्र करण्यासाठी गेल्या महिन्यात महासभेत देखील ठराव करण्यात आला होता. कामकाजादरम्यान मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी या ठरावाची माहिती न्यायालयात सादर करतात का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर मनपा आयुक्तांनी मनपाकडून एक अर्ज न्यायालयात सादर करण्यात आला. घरकुल प्रकरणात न्यायालयाने संबधित नगरसेवकांना दोषी ठरविले असून, याबाबत १२ मे रोजी झालेल्या मनपाच्या महासभेत नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी संबधित पाच नगरसेवकांना अपात्र करण्यात यावे असा प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावाला महासभेने मंजूरी दिली असल्याचे आयुक्तांनी आपल्या अर्जात नमुद केले आहे. महासभेने मंजूरी दिल्यामुळे संबधित नगरसेवकांना अपात्र करण्यात यावे अशी मागणी आयुक्तांनी केली. तसेच या प्रकरणी लवकर निकाल जाहीर व्हावा यासाठी या प्रकरणी न्यायालयात दररोज कामकाज करण्याची विनंती देखील मनपा आयुक्तांनी न्यायालयाकडे केली आहे.
काय आहे प्रकरण
घरकुल प्रकरणात दोषी ठरलेल्या भगत बालाणी, कैलास सोनवणे, लता भोईटे, सदाशिव ढेकळे व दत्तात्रय कोळी या नगरसेवकांना अपात्र करण्यासाठी शिवसेनेचे नगरसेवक प्रशांत नाईक यांनी जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली आहे. सध्या सर्व नगरसेवक जामिनावर असून मनपाच्या कामकाजात सक्रीय आहेत. कोरोनामुळे हे कामकाज थांबले होते. याआधी शिवसेनेने या प्रकरणी फारसे लक्ष दिले नव्हते. मात्र, महापालिकेत सत्तातर झाल्यानंतर सेनेला मतदान केलेल्या नगरसेवकांविरोधात भाजपने अपात्रतेची याचिका नाशिक विभागीय आयुक्तांकडे सादर केल्यानंतर सेनेने देखील महासभेत ठराव करून, भाजपच्या नगरसेवकांना अपात्र करण्याची तयारी सुरु केली आहे. सध्या हे प्रकरण न्यायालयात असून, आता पुढील कामकाज १ जुलै रोजी होणार आहे. मनपाकडून ॲड.आनंद मुजूमदार, ॲड.जयेंद्र पाटील, प्रशांत नाईक यांच्याकडून ॲड.सुधीर कुलकर्णी हे काम पाहत आहेत.