जळगाव : कोरोना रुग्णालयात बाधितांच्या संख्येबरोबरच मृतांचा आकडाही वाढत आहे. बाधितांचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकही मृतदेहाला हात लावत नसल्याने मृतदेहांची अवहेलना होत आहे़ अंत्यसंस्काराअभावी हे मृतदेह पाच ते सहा तास पडून असल्याचा प्रकार घडत आहे.कोरोना रुग्णालयात गेल्या चार दिवसांपासून रोज एक किंवा दोन बाधितांचा मृत्यू होत आहे़ रविवारी रात्रीही एका बाधिताचा मृत्यू झाला मात्र, मृतदेहाला कुणीच हात लावायला तयार नव्हते़ अखेर काही डॉक्टरांनीच मृतदेह स्मशानभूमित नेला मात्र, त्या ठिकाणीही जागा नव्हती़ अखेर कसेबसे अंत्यसंस्कार करण्यात आले़ अंत्यसंस्कार करायला महापालिकेची शासकीय यंत्रणाच नसल्याने मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याचे सांगितले जात आहे़ बाधितावर अंत्यसंस्कार करताना नातेवाईकही अगदी एक किंवा दोन उपस्थित असतात़ अनेक दिवसांपासून हा गंभीर प्रश्न समोर आला आहे़ शिवाय अंत्यसंस्कारासाठी लागणारी लाकडांची व्यवस्थाही डॉक्टरांनाच करावी लागत असल्याचे समोर येत आहे़महापालिकेकडे जबाबदारीबाधितांवर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी ही महापालिकेकडे देण्याचा निर्णय बैठकीत झाला आहे़ शिवाय संबधित कर्मचाऱ्यांच्या विम्याबाबत शासनाच्या नियमानुसार चाचपणी करण्यात येणार असल्याची माहिती आहे़ मात्र, यापुढे मृतदेहांची अशी अवहेलना होणार नाही, असे सांगण्यात आले आहे़तर सायनसारखी परिस्थितीकोरोना रुग्णालयात काही दिवसांपूर्वी अमळनेर येथील एका बाधिताचा मृत्यू झाल्यानंतर मृतदेह तब्बल दोन तास कोरोना कक्षात पडून होता़ शिवाय सायंकाळी नातेवाईकही तो ताब्यात घेत नव्हते़ असाच काहीसा प्रकार रविवारीही झाला़ अशीच परिस्थिती राहिली तर सायन रुग्णालयात घडलेला गंभीर प्रकाराची जळगावात पुनरावृत्ती होऊ शकते, असेही बोलले जात आहे़ सायन रुग्णालयात अनेक बेडवर मृतदेह पडून होते व त्यांच्या शेजारीच रुग्णांवर उपचार सुरू असल्याचा व्हिडिओ समोर आला होता़
कोरोना बाधितांच्या मृतदेहांची अवहेलना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2020 12:05 PM