लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : महापौरपदाच्या निवडीसाठी अवघे दोन दिवस शिल्लक असतानाच झालेल्या राजकीय भूकंपामुळे सत्ताधारी भाजपचे राजकीय गणित बिघडले आहे. त्यातच शिवसेनेने भाजपचे तब्बल २५ नगरसेवक आपल्याकडे खेचून महापौरपदावर दावा केला आहे. मात्र फुटीच्या राजकारणात माजी मंत्री एकनाथ खडसे यांची एण्ट्री झाल्याने आता फुटलेल्या नगरसेवकांमध्ये नाराजी वाढली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
एकनाथ खडसे यांनी सोमवारी प्रसारमाध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत उपमहापौर अद्याप ठरलेला नसल्याचे सांगितले. त्यातच शिवसेनेने महापौरपदासाठी जयश्री महाजन, तर उपमहापौरपदासाठी कुलभूषण पाटील यांचे नाव जाहीर केले होते. मात्र खडसे यांच्या वक्तव्यामुळे फुटलेल्या नगरसेवकांमध्ये बेचैनी वाढल्याची माहितीही अधिकृत सूत्रांनी दिली आहे. एकनाथ खडसे विद्यमान उपमहापौर सुनील खडके यांच्यासाठी आग्रही आहेत. मात्र शिवसेनेचे अनेक नगरसेवक, पदाधिकारी व भाजपमधून फुटलेल्या काही नगरसेवकांकडून कुलभूषण पाटील यांचे नाव उपमहापौरपदासाठी पुढे केले जात आहे. खडसेंनी नवीन नाव पुढे केल्याने फुटलेल्या नगरसेवकांमध्ये नाराजी वाढली आहे. याबाबत तोडगा काढण्यासाठी ठाणे येथील एका हॉटेलमध्ये एकनाथ खडसे, गुलाबराव पाटील व एकनाथ शिंदे यांच्यातदेखील सोमवारी रात्री बैठक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
कुलभूषण पाटील यांना उपमहापौरपद दिल्यास, खडके यांना स्थायी समिती सभापतिपद?
सुनील खडके यांच्या नावासाठी माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यासह ठरावीक नगरसेवकदेखील आग्रही आहेत. मात्र, भाजपमधून फुटलेल्या नगरसेवकांमध्ये मुख्य सूत्रधार कुलभूषण पाटील हे असल्याने अनेकांचा आग्रह कुलभूषण पाटील यांच्या नावासाठी आहे. यावर तोडगा काढण्यासाठी जळगावमधील शिवसेना नगरसेवकांच्या देखील काही बैठका सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यानुसार कुलभूषण पाटील यांना उपमहापौरपद दिल्यास पुढील स्थायी समिती सभापतिपद सुनील खडके यांना देण्याबाबतचा प्रस्तावदेखील शिवसेनेकडून देण्यात आल्याची चर्चा आहे.
खडसे यांना श्रेय देण्यास शिवसैनिकांचा नकार
भाजपमधून फुटलेले नगरसेवक हे खडसेंच्या सांगण्यावरून फुटले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली असतानाच, अनेक शिवसैनिकांनी व फुटलेल्या काही नगरसेवकांनी ती धुडकावून लावली आहे. कुलभूषण पाटील यांनी सोमवारी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीत आम्ही सर्व नगरसेवक स्वयंस्फूर्तीने शिवसेनेत दाखल झाल्याचे सांगितले होते. त्यातच या फुटीमध्ये मुख्य भूमिका पार पाडलेल्या शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार याबाबत एकनाथ खडसे यांनादेखील कोणतीही सूचना देण्यात आली नसल्याचे सांगितले. तसेच शिवसेनेच्या अनेक नेत्यांनादेखील व जिल्ह्यातील आमदारांनादेखील याबाबतची माहिती देण्यात आली नसल्याचे संबंधित पदाधिकाऱ्याने लोकमतला सांगितले. यामुळे भाजपच्या फुटीवरून श्रेयवाददेखील सुरू झाला असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.