लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्हा परिषदेत कोरोनाचा संसर्ग प्रचंड वाढला आहे. यात अनेक प्रमुख अधिकारी बाधित होत आहेत. मात्र, मार्च अखेर असल्याने हे अधिकारी अशा स्थितीतही घरून कार्यभार पाहत आहेत. त्यांच्याकडून येणाऱ्या फाईलींमुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोकाही व्यक्त केला जात आहे.
गौण खनिज प्रकरणात लघुसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडील पदभार काढण्याचे तोंडी आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी डॅा. बी. एन. पाटील यांनी दिले होते. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी पाटील यांचा अहवाल बाधित आढळून आला मात्र, तरीही ते घरून कार्यभार पाहत असल्याची माहिती समोर आली. त्यामुळे यातून कोरोनाचा संसर्ग वाढणार असून पदभार दुसर्यांकडे का सोपविला जात नाही, असा सवाल काही सदस्यांनी केला आहे.
उपस्थितीवर बंधने
जिल्हा परिषदेत संसर्गाचे प्रमाण वाढल्याने उपस्थितीवर बंधने घालण्यात आली आहे. मात्र, बांधकाम विभागातील गर्दीवर मात्र नियंत्रण मिळविणे प्रशासनाला अशक्य होत आहे. दररोज या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी उसळत आहे. मार्च अखेरची ही गर्दी कोरोनाला निमंत्रण देत असल्याचे बोलले जात आहे.