लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्हा परिषदेला पुरविण्यात आलेल्या सॅनिटायझरमध्ये ८० टक्के पाणी असल्याने यात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप जि. प. सदस्य अमित देशमुख यांनी केला होता. मात्र, या सॅनिटायझरचे प्रयोगशाळेतील नमुने निल आल्याने जे सॅम्पल पाठविण्यात आले होते, त्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. आरोग्य समितीच्या सभेत पुन्हा एकदा हा विषय गाजला. त्यामुळे या प्रकरणाची निष्पक्षपणे चौकशी होण्याची मागणी होत आहे.
सॅनिटायझरबाबत आरोप केल्यानंतर याबाबत प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आली. याचा अहवाल निल दाखविण्यात आला होता. दरम्यान, या विषयावर जि. प. आरोग्य समितीच्या सभेत सदस्य अमित देशमुख यांनी विषय उपस्थित केला. १६ जून रोजी हे सॅनिटायझर संपल्याचे मला सांगण्यात आले होते, मग प्रयोगशाळेला नेमका नमुना कोणता पाठविला, हा प्रश्न देशमुख यांनी उपस्थित केला. यावर कंपनीकडून दुसरा नमुना मागवून त्याची प्रयोगशाळेत तपासणी केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. यानंतर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. कंपनीकडून मागविलेला अहवाल निल येणारच असे सांगत, यात मोठा घोळ झाल्याचा आरोप अमित देशमुख यांनी केला. या चौकशीवचर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या बैठकीला डॉ. नीलम पाटील, जळगाव पंचायत समिती सभापती संगीता पाटील यांचीही उपस्थिती होती.
लाभार्थ्यांपर्यंत आहार पोहोचत नाही
अंगणवाड्यांकडून लाभार्थ्यांच्या घरापर्यंत पूर्ण पोषण आहार पोहोचत नसल्याचे जि. प. सदस्या डॉ. नीलम पाटील यांनी सांगितले. कुपोषणाच्या बाबतीतील उपाययोजना या स्थानिक पातळीपर्यंत पोहोचत नसल्यानेच कुपोषित बालकांची आकडेवारी वाढल्याचे त्यांनी सांगितले.