लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : काेविशिल्ड लसीचे १७ हजार ५० डोस रविवारी जिल्ह्याला प्राप्त झाले असून जि.प.अध्यक्षा रंजना पाटील यांनी जिल्हाआरोग्य अधिकारी डॉ. बी. टी. जमादार यांच्याशी चर्चा करून जिल्ह्याला हे डोस वाटप केले आहे. यात जळगावातील दहा केंद्रांसाठी १३५० डोस मिळाले आहे. दरम्यान, विश्वप्रभा रुग्णालयात खासगी तत्त्वावर कोव्हॅक्सिन लस देण्यास रविवारी सुरूवात करण्यात आली आहे. पहिल्या दिवशी ३५० लोकांनी या ठिकाणी लस घेतली.
शहरात लस नसल्याने रविवारी सर्वच केंद्र बंद होते. त्यात आता १३५० डोस उपलब्ध झाले असून हे एका दिवसात संपतील, असे चित्र आहे. मोबाईल टीम व पोलीस मुख्यालयातील केंद्रासाठी अनुक्रमे १०० व २०० डोस देण्यात आले आहे. महापालिकेच्या केंद्रांसाठी ६०० डोस आहेत.
खासगीतही ॲपवरच नोंदणी हवी
खासगी रुग्णालयात १८ ते ४४ वयोगटाला लस घ्यायची असल्यास त्यांना कोविन ॲपवर नोंदणी करून स्लॉट मिळाल्यानंतर लस घेता येणार आहे. यासह ४५ वर्षावरील नागरिकांनी ऑनलाईन नोंदणी करावी किंवा रुग्णालयाशी संपर्क करावा, असे दोन पर्याय खुले आहे.