ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 18 -चलनात आलेल्या 200 रुपयांच्या नोटांबाबत शहरवासीयांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण होऊन त्या मिळविण्यासाठी बँकामध्ये गर्दी झाली. मंगळवारी एकाच दिवसात 6 कोटी 52 लाख रुपये किंमतीच्या या नोटांचे वाटप करण्यात आले. सोमवार व मंगळवार मिळून 10 कोटी 72 लाख रुपये किंमतीच्या 200 रुपयांच्या नोटांचे वितरण झाल्याची माहिती मिळाली. दरम्यान, मंगळवारी धनत्रयोदशी असल्याने नवीन नोटांचे पूजन करावे, यासाठी अनेकांनी या नोटा मिळविण्यासाठी बँकामध्ये गर्दी केली होती.स्टेट बँकेच्या मुख्य शाखेतून शहरासह जिल्ह्यातील बँकांना नोटा देण्यात आल्या व याच शाखेमध्येही ग्राहकांना नोटा देण्यासह बदल करूनही देण्यात आल्या. शनिवारीच स्टेट बँकेच्या मुख्य शाखेत 200 रुपये किंमतीच्या 15 लाख नोटा दाखल झाल्या होत्या. मात्र दुस:या शनिवारची सुट्टी व दुस:या दिवशी रविवार असल्याने सोमवारपासून या नोटांचे वाटप सुरू झाले. यामध्ये सोमवारी 4 कोटी 20 लाख रुपये किंमतीच्या नोटांचे वितरण करण्यात आले. मंगळवारी धनत्रयोदशी असल्याने नवीन नोटांचे पूजन करण्याच्या भावनेने या नोटांना अधिक मागणी वाढली. त्यामुळे आज एकाच दिवशी 6 कोटी 52 लाख रुपये किंमतीच्या नोटांचे वितरण करण्यात आले.