गेल्याने, हा तरुण पूर्णत: अपंग झाला. या तरुणास एका डोळ्याने आंधळ्या असलेल्या पत्नीचा आधार घ्यावा लागत असल्याचा व्हिडीओ शहरात व्हायरल होताच, माजी नगराध्यक्ष अतुल पाटील, तसेच नगरसेवक मुकेश येवले व मित्रमंडळींनी त्वरित दखल घेत, मराठा एकता फाउंडेशनच्या वतीने चारचाकी सायकल, दोन महिन्यांचा किराणा व पाच हजार रुपये रोख रकमेसह, तसेच या दाम्पत्याला कपडेलत्ते देऊन अपंग पतीची सेवा करणाऱ्या पत्नीचा शुक्रवारी सायंकाळी गौरव केला. मध्य प्रदेशातील शिरवेल येथील मूळचा रहिवासी असलेला ३५ वर्षीय हिरालाल बुदला बारेला हा जन्मत: दोन्ही पायांनी अपंग असलेला तरुण गेल्या पाच वर्षांपासून येथील शिवाजीनगरात राहतो. दोन्ही पायाने अपंग असला, तरी शेतमजुरी करण्यासाठी तो जायचा. गेल्या चार महिन्यांपूर्वी कडबा कुट्टी मशीनमध्ये दोन्ही हात गेले. त्यामुळे तीन लहान बालकांसह कुटुंब पोसण्याचा त्याच्यापुढे प्रश्न उभा ठाकला. मात्र, याच परिसरात असलेले नरेद्र शिंदे यांनी वेळोवेळी मदत करून त्याच्या कुटुंबास आधार दिला.
व्हिडीओ पाहून मिळाली मदत
या दिव्यांग युवकास कोठे बाहेर जायचे झाल्यास, त्याची एका डोळ्याने आंधळी असलेली पत्नी त्याला कडेवर घेऊन जायची. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर, तो पाहून मराठा एकता फाउंडेशनच्या वतीने मदत देण्यात आली. याप्रसंगी राकाँचे युवा तालुकाध्यक्ष देवकांत पाटील, हितेश गजरे, अॅड. गोविंद बारी, अॅड.राजेश बारी, गणेश महाजन, धिरज महाजन, गोलू माळी, एजाज पटेल यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.