जळगाव : पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या आमदार निधीतून शिवसेनाप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवारी दुपारी ४ वाजता सरदार पटेल लेवा भवनात दिव्यांगांना साहित्यवाटप करण्यात येणार आहे. यासाठी काही दिवसांपूर्वी दिव्यांगांची तपासणी करण्यात आली होती. यातून निवडण्यात आलेल्या दिव्यांगांना तीनचाकी सायकल, चेअर, एलबो स्टीक, व्हीलचेअर, कर्णयंत्र, अंधकाठी, वॉकिंग स्टीक, वॉकर आदी साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. शहरातील सरदार पटेल लेवा भवन सभागृहात सायंकाळी चार वाजता या साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे.
मनपा महावितरणला आज वर्ग करणार निधी
जळगाव : शिवाजीनगर उड्डाणपुलालगत असलेले विद्युतखांब हटविण्यासाठी मनपाकडून महावितरणला सोमवारी दीड कोटी रुपयांचा निधी वर्ग करणार आहे. यासाठी महापौर जयश्री महाजन यांचे पत्र आयुक्तांना मिळाल्यानंतर आयुक्तांनी याबाबत संपूर्ण प्रक्रिया पार पाडली आहे. सोमवारी हा निधी वर्ग झाल्यानंतर आठवडाभरातच या कामाला सुरुवात करण्यावर भर दिला जाणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.
पूर्णवेळ दुकाने उघडण्याची परवानगी द्या
जळगाव : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या आता पूर्णपणे नियंत्रणात आली असून, जिल्हा प्रशासनाने आता दुपारी ४ वाजेपासून लावलेले निर्बंध कमी करण्याची मागणी फुले मार्केट असोसिएशनतर्फे करण्यात आली आहे. आधीच दुकानदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, प्रशासनाने आता पूर्णवेळ दुकाने उघडण्याची परवानगी देण्याची मागणी व्यापाऱ्यांकडून होत आहे.
आव्हाणे फर्स्टतर्फे वृक्षारोपण कार्यक्रम
जळगाव - तालुक्यातील आव्हाणे येथील आव्हाणे फर्स्ट संस्थेतर्फे गावात वृक्षारोपण कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. गाव व परिसरात ५०० वृक्षांची लागवड व संगोपन करण्यात येणार असून, प्रत्येक वृक्ष गावातील एका नागरिकाला दत्तक म्हणून दिला जाणार आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते गावातील मुख्य फाट्याजवळ वृक्षारोपण करून या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे.