कुंदन पाटील
जळगाव : तालुक्यातील २ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी एक लाख रूपये मदतीचा धनादेश तर गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत धरणगाव तालुक्यातील बांभोरी बु., पिंप्री व बांभोरी प्र.चा. येथील ३ शेतकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी २ लाखाचे धनादेश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते वाटप करण्यात आले.
अजिंठा विश्रामगृहावर मदत वाटपाचा कार्यक्रम झाला. यावेळी तालुका कृषी अधिकारी पी. जे. चव्हाण यांच्यासह कृषी सहाय्यक उपस्थित होते.
५० लाखाचे सानुग्रह अनुदान वाटप जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवर कार्यरत असलेले कर्मचारी नाना लक्ष्मण वाघ (कोतवाल, शिरसोली) यांचा कर्तव्य पार पाडताना कोरोना विषाणू संसर्गाने २८ मार्च २०२१ रोजी मृत्यू झाला होता. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाठपुराव्याने त्यांना शासनाकडून ५० लाखाचे सानुग्रह अनुदान मंजूर करण्यात आले होते. वाघ यांच्या कायदेशीर वारसास ५० लाखाचे सानुग्रह अनुदान पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते देण्यात आले.
जिल्हाधिकारी अमन मित्तल, तहसीलदार नामदेव पाटील यांच्यासह महसुल विभागाचे अधिकारी व कर्मचारी आदी उपस्थित होते. प्रास्ताविक तहसीलदार नामदेव पाटील यांनी केले.