मुक्ताईनगर : प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत शिधापत्रिकाधारकांना मोफत वाटप सुरू असलेली चणाडाळ अतिशय निकृष्ट दर्जाची तसेच डाळीचे अक्षरशः पीठ झाले असून, त्यात किडे (धनोर) पडले असल्याची तक्रार लाभार्थींनी केली आहे.
प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत अंत्योदय, प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारकास प्रतिपत्रिका एक किलो चणाडाळ मोफत वाटप करण्यात येत आहे. बुधवारी ही डाळ ग्रामीण भागात स्वस्त धान्य दुकानदारांनी वाटप केली. तेव्हा ती अतिशय निकृष्ट दर्जाची तसेच डाळीचे अक्षरशः पीठ झालेले पहायला मिळाले. डाळीत किडे (धनोर) पडले आहेत. ही डाळ खाल्ल्यामुळे नागरिकांचे आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. अशी डाळ देऊन जनतेची थट्टा उडवली असल्याचा प्रकार समोर येत आहे.
चौकट
तक्रारींच्या अनुषंगाने आमदार चंद्रकांत पाटील यांनी त्यांचे स्वीय सहाय्यक प्रवीण चौधरी, शिवसेनेचे शहर संघटक वसंता भलभले, गोपाळ सोनवणे यांना तत्काळ शासकीय धान्य गोडाउनमध्ये डाळीची पाहणी करण्यासाठी पाठवले. त्यांनी सर्व प्रकार आमदार पाटील यांच्या लक्षात आणून दिला. आमदार पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे यासंदर्भात तक्रार केली आहे.