जळगाव: अनेक वादविवादानंतर अखेर आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्याला मुहुर्त सापडला असून हा सोहळा सोमवारी १६ सप्टेंबर रोजी जळगावातील सरदार वल्लभ भाई पटेल लेवा भवनात दुपारी दोन वाजता आयोजित करण्यात आला आहे़ शनिवारी शिक्षण सभापतींनी नियोजन बैठक घेतली.जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्ज्वला पाटील यांच्या निवासस्थानी शनिवारी दुपारी अतिरिक्त पदभार असलेले उपशिक्षणाधिकारी एस. एस. चौधरी यांच्यासह शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. या बैठकीत या सोहळ्याचे नियोजनावर चर्चा करण्यात आली. यानंतर अध्यक्षा उज्ज्वला पाटील यांच्या परवानगीने सायंकाळपर्यत यादी प्रसिद्ध केली जाणार असल्याचेही सांगण्यात आले. यानंतर सभापती पोपट भोळे लागलीच मुक्ताईनगर येथे आमदार एकनाथराव खडसे यांची भेट घेण्यासाठी रवाना झाल्याचे सांगण्यात आले. पालकमंत्री गिरीश महाजन यांची वेळ न मिळाल्याने हा सोहळा पुढे ढकलण्यात आल्याचे स्पष्टीकरण शिक्षण विभागाने दिले होेते़ मात्र, सोमवारीही पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थिीतीबाबत संभ्रम असल्याचे सांगण्यात येत आहे. या पुरस्कारावरून अनेक आरोप प्रत्यारोप झाल्यानंतर आपण काही सिद्ध झाल्यास राजीनामा देऊ, असा पवित्रा शिक्षण सभापती पोपट भोळे यांनी घेतला होता. त्यामुळे या पुरस्काराकडे सर्वांचे लक्ष लागून आहे़ दरम्यान, शनिवारी दुपारी अधिकाऱ्यांनी सरदार वल्लभभाई पटेल सभागृहाची पाहणीही केली.
अखेर मुहूर्त ठरला शिक्षक पुरस्काराचे सोमवारी वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2019 4:09 PM