जळगाव- शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरात नागरिकांना पिण्याचे पाणी वाटप राष्ट्रवादीच्या वक्ता प्रशिक्षण विभागातर्फे रविवारी वितरित करण्यात आले. यावेळी वक्ता प्रशिक्षण शहर जिल्हाध्यक्ष साहिल पटेल , अभिषेक पाटील, जाकीर पिंजारी, अल्तमश खान, मोसीन खाटीक, रशीद खान, शकील पटेल आदी याप्रसंगी उपस्थित होते. या परिसरात पिण्याचे पाणी येत नसल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याने राष्ट्रवादीतर्फे पाण्याचे टँकरद्वारे पाणी वितरण करण्यात आले.
‘त्या’ अतिक्रमणाकडे मनपाचे दुर्लक्षच
जळगाव - शहरातील जुन्या बी.जे.मार्केट परिसरात अनधिकृतपणे दुकाने तयार करून, अतिक्रमण करणाऱ्या माजी नगरसेवकाच्या त्या दुकानांवर मनपा प्रशासनाने अद्यापही कारवाई केलेली नाही. एकीकडे शहरातील रस्त्यावरील हॉकर्सवर मनपाची कारवाई सुरु असताना या अतिक्रमणाला अभय का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मनपाने या ठिकाणच्या अतिक्रमणधारकांना नोटीस देखील बजावली होती. मात्र, नोटीस बजावून देखील अद्याप कोणतीही कारवाई प्रशासनाकडून करण्यात आलेली नाही.
खेडी रस्त्याला जोडणारा रस्ता विकसीत करा
जळगाव - शहरातील का.ऊ.कोल्हे विद्यालयालगत जुना भुसावळ रस्ता व खेडी रस्ता यांना जोडणारा १८ मी. रुंदीचा रस्ता विकास योजनेत दाखविण्यात आला आहे. मात्र, मनपाने अद्यापही या रस्त्यासाठीची जागा भूसंपादित केलेली नाही. हा रस्ता विकसीत झाल्यास रहिवाश्यांची मोठी सोय होणार असून, या परिसराचा विकास देखील होणार आहे. त्यामुळे या रस्त्याची जागा भुसंपादित करण्यात यावी अशी मागणी माजी नगरसेविका ममता कोल्हे यांनी केली असून, याबाबत महापौर व मनपा आयुक्तांना त्यांनी निवेदन देखील सादर केले आहे.
पुन्हा होवू शकते थंडीचे आगमन
जळगाव - गेल्या आठवडाभरापासून जिल्हाभरात ढगाळ वातावरण कायम असून, थंडी गायब झाली आहे. काही भागात अवकाळी पावसाने देखील हजेरी लावली होती. दरम्यान, येणाऱ्या दोन दिवसात जिल्ह्यात पुन्हा थंडीची लाट पसरण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. राजस्थान व मध्यप्रदेशमध्ये तयार झालेला कमी दाबाचा पट्टा आता कमी झाला असून, उत्तरेकडून येणारे थंड वारे आता महाराष्ट्राच्या दिशेने पुन्हा सक्रीय होणार आहेत. तसेच जिल्ह्यात आता कोरडे हवामान निर्माण झाल्यास तापमानात घट होवून पुन्हा थंडीचे आगमण होणार आहे.
वॉटरग्रेसबाबत मनपाची उदासीन भुमिका
जळगाव - शहराच्या दैनंदिन सफाईचा मक्ता असलेल्या वॉटरग्रेसने उपठेका दिल्याचे जवळपास स्पष्ट झाले असतानाही मनपा प्रशासनाकडून अद्यापही वॉटरग्रेसवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. पंधरा दिवसांपासून या प्रकरणी मनपाने कोणतीही भूमिका घेतलेली नाही. विशेष म्हणजे महापौर व उपमहापौरांनी देखील वॉटरग्रेस चे काम थांबविण्याची मागणी केली आहे. मात्र, प्रशासन केव्हा कारवाई करेल असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.