लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : रब्बी हंगाम संपून आता शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागला असताना देखील अद्यापही रब्बी पिकांच्या खरेदीसाठी हमीभाव केंद्र सुरू झालेले नाही. त्यात राज्य शासनाने मका खरेदीचे उद्दिष्ट जाहीर केले असून, जळगाव जिल्ह्याला मका खरेदीसाठी ६० हजार क्विंटल खरेदीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.
राज्यासाठी एकूण ३ लाख क्विंटल मका खरेदीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यामध्ये सर्वाधिक उद्दिष्ट जळगाव जिल्ह्याला देण्यात आले आहे. यामुळे जिल्ह्यातील मका उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होणार असला, तरी खरेदी केंद्र केव्हा सुरू होतील याबाबत मात्र राज्य शासनाने अजूनही कोणतेही आदेश काढलेले नसल्याने मका उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढलेल्या आहेत. गेल्यावर्षी देखील जळगाव जिल्ह्याला ४० हजार क्विंटल मका खरेदीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी २० हजार क्विंटलने उद्दिष्ट वाढले असले तरी मका उत्पादक शेतकऱ्यांची हमीभाव केंद्रावर माल विक्रीसाठी झालेली नोंदणी मात्र गेल्या वर्षाच्या तुलनेत फारच कमी आहे. तसेच अनेक नोंदणीकृत शेतकऱ्यांनी शासकीय खरेदी केंद्र सुरू होण्याची प्रतीक्षा न करता आता व्यापाऱ्यांना आपला माल विक्री करण्यास सुरुवात केली आहे. शासकीय खरेदी केंद्रांना होणाऱ्या उशिरामुळे शेतकऱ्यांनी आता ही भूमिका घेतली आहे.
मका विक्रीसाठी सहा हजार शेतकऱ्यांची नोंदणी
रब्बी हंगामातील पिकांसाठी जळगाव जिल्ह्यात एकूण १६ हमीभाव केंद्रांवर १ एप्रिलपासून शेतकऱ्यांच्या नोंदणी प्रक्रियेला सुरुवात झाली होती. ३० एप्रिलपर्यंत ही नोंदणीसाठी मुदत निश्चित करण्यात आली होती. त्यानुसार मका विक्रीसाठी जिल्ह्यातील ६ हजार ५७४ शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे. ज्वारीसाठी सर्वाधिक १० हजार ६७९ शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे. सर्वात कमी नोंदणी ७६ इतकी गव्हासाठी झाली आहे. मका खरेदीसाठी राज्य शासनाने उद्दिष्ट जाहीर केले असले तरी मात्र हमीभाव केंद्र केव्हा सुरू होतील याबाबत कोणतीही घोषणा शासनाने केलेली नाही. त्यामुळे नोंदणी केलेले शेतकरी देखील आता हमीभाव केंद्र सुरू होण्याची वाट न पाहता खरीप हंगामासाठी लागणारे भांडवल उभे करण्यासाठी शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना माल विक्री करण्यास सुरुवात केली आहे.
कोट..
उद्दिष्ट जाहीर केले मात्र खरेदी केव्हा करणार
राज्य शासनाने मका खरेदी एप्रिल महिन्यातच सुरू करण्याची गरज होती. मात्र ती खरेदी सुरू न झाल्याने शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना आपला माल विक्री केला आहे. त्यामुळे आता खरेदी केंद्र सुरू करून देखील शेतकऱ्यांना कोणताही लाभ यामुळे मिळणार नाही. शेतकऱ्यांचा नावावरच व्यापारीच आपला माल याठिकाणी विक्री करतात.
-ॲड. हर्षल चौधरी, शेतकरी