जळगाव : कोरोना या आजारामुळे लग्न सराईवर मोठा परिणाम झाला असून मार्च व एप्रिल महिन्यात होऊ घातलेले सर्वच लग्न सोहळे स्थगित झाले आहेत. त्यामुळे यावर अवलंबून मंगल कार्यालय, लॉन्स, बॅँड, घोडा, पार्लर व मंडप हा व्यवसायही थांबला असून काही जणांनी अॅडव्हॉन्स घेतलेली रक्कम परत केली आहे तर काहींनी पुढच्या तारखात समायोजन केले आहे.कोरोनामुळे संपूर्ण देशभरात लॉकडाऊन झाले आहे. १४ एप्रिलपर्यंत संपूर्ण देश जागेवर थांबला असून या कालावधीत कारोना नियंत्रणात आला नाही तर आणखी लॉकडाऊनमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. लग्न हा आयुष्यातील सर्वोच्च आनंदाचा क्षण असल्याने प्रत्येक जण नातेवाईक, मित्र मंडळी यांना आमंत्रिक करुन भव्यदिव्य सोहळा पार पाडण्याचे नियोजन करीत असतो. कोरोनामुळे या स्वप्नांना तुर्तास ब्रेक लागला आहे. गेल्या आठवड्यात एमआडीसी पोलिसांनी पुढाकार घेऊन एक लग्न सोहळा स्थगित केला. वर पित्याची भेट घेऊन त्यांची समजूत घातली. त्यानंतर हा सोहळा स्थगित झाला. विशेष म्हणजे लॉन मालकाने संपूर्ण रक्कम परतही केली.अॅडव्हान्स परत, काही ठिकाणी समायोजनमार्च व एप्रिल महिन्यात होऊ घातलेल्या लग्नसोहळ्यात बुकींग झालेले मंगल कार्यालय, घोडा, बॅँड, मंडप, पार्लर, केटरिंग, फुले, हार, भटजी,पाण्याचे जार यासह तत्सम वस्तुंची बुकींग झालेली आहे. काही सोहळ्यात वधू व वर पक्षाने तारखा रद्द केल्या असल्या तरी बुकींगची रक्कम परत न घेता मे व जून महिन्यात लग्न सोहळे होणार असल्याने तेव्हा समायोजन करण्याचा निर्णय घेतला.मार्च व एप्रिल महिन्यात नवरी सजावटीच्या तारखा बुकींग झालेल्या होत्या. मात्र ते सोहळे आता रद्द झाले. ते लग्न मे व जून महिन्यात होणार असल्याने अॅडव्हान्सची रक्कम परत न करता पुढच्या तारखात अॅडजस्ट केली आहे. एकाच तारखेला दोन लग्नांची मात्र आॅर्डर रद्द करण्यात आली आहे.-रंजना पाटील, संचालक, वैष्णवी ब्युटी अॅकेडमी, वडली,जळगाव
‘कोरोना’ने थांबविली जिल्ह्याची लग्नसराई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2020 12:39 PM