लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गेल्या पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे नागरिक पूर्णपणे बेहाल झाले आहेत. जळगाव शहराचा पारा गेल्या पाच दिवसांपासून ४२ अंशांवर कायम आहे. प्रचंड उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले असताना, जिल्ह्यात आगामी तीन दिवस पुन्हा अवकाळी पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे तापमानात काहीअंशी घट होऊन नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. तसेच पुढील तीन दिवस काहीअंशी ढगाळ वातावरणदेखील पहायला मिळू शकते.
गेल्या काही वर्षांपासून हवामानात मोठ्या प्रमाणात बदल होत आहे. जिल्ह्यातील प्रत्येक हंगामावर याचा परिणाम होताना दिसून येत आहे. गेल्या दोन वर्षांत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली असून, हिवाळ्यात मात्र घट झाली आहे. यावर्षी ऑक्टोबर महिन्यात परतीचा पाऊस गेल्यानंतर, नोव्हेंबर ते मार्च महिन्यापर्यंत प्रत्येक महिन्यात जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. जिल्ह्यात यावर्षी मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसाची नोंद झाली असून, यामुळे शेतीवरदेखील मोठा परिणाम होताना दिसून येत आहे. तसेच आता पुन्हा एप्रिल महिन्यातदेखील आगामी तीन दिवस पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. विदर्भ व मराठवाडा या भागात पावसाची शक्यता सर्वाधिक असून, जिल्ह्यात पावसाचा २० टक्के अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
अवकाळी पावसाचे नेमके कारण काय ?
गेल्या दोन दिवसांत पूर्वउत्तर प्रदेश व बिहारमधील काही भागांमध्ये एक कमी दाबाचा व चक्रवाती हवांचे क्षेत्र विकसित होऊन विदर्भ ते मध्य महाराष्ट्रपर्यंत पसरलेले आहे. याच्याव्यतिरिक्त बंगालच्या उपसागराकडून मात्र युक्त हवा महाराष्ट्राकडे वाहून येत आहे, यामुळे राज्यात पुन्हा अवकाळीचे संकट उभे राहिले आहे. जिल्ह्यात सायंकाळी ढगांच्या गडगडाटांसह काहीअंशी वादळी पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.
केळीला बसू शकतो फटका
हवामान खात्याने जिल्ह्यात पुन्हा अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त केला असल्याने , केळी उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. जिल्ह्यातील रबी पिके जवळजवळ पूर्णपणे काढण्यात आली आहेत. यामुळे केळीच्या बागेला वादळी पावसामुळे फटका बसण्याची शक्यता आहे. तसेच पाऊस झाला तर कडबा ओला होऊन पुढे चाऱ्याचाही प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.