लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोना वार्ड असून, तुम्ही बाहेर जा, असे बोलल्याचा राग येऊन दोन तरुणांनी जिल्हा रुग्णालयातील बेड साइड असिस्टंट महिलेचा विनयभंग केल्याची घटना गुरुवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी अमोल सुधाकर तायडे (२१) व शंकर नितीन सोनवणे (२३, दोन्ही रा.असोदा रोड) यांच्याविरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आली आहे.
पीडित महिला ही बेड साइड असिस्टंट म्हणून जिल्हा रुग्णालयात कार्यरत आहेत. गुरुवार, १५ एप्रिल रोजी पीडित महिला ही जिल्हा रूग्णालयातील वॉर्ड क्र.सी-२ मध्ये ड्युटीवर होत्या. रात्री ११ वाजेच्या सुमारास वॉर्ड क्र.सी-२ मध्ये अमोल तायडे व शंकर सोनवणे हे दोन तरुण आले. त्यावेळी पीडित महिलेने हा कोरोना वार्ड असून, तुम्ही बाहेर जा, असे दोघांना सांगितले. मात्र, याचा राग येऊन दोघा तरुणांनी महिलेस लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करून महिलेचा विनयभंग केला. अखेर शुक्रवारी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून दोन्ही तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.