जळगाव : नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी दरमहा पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. मात्र, सध्याच्या कोरोनाचा प्रार्भाव पाहता ३ मे रोजी सकाळी ११ वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे लोकशाही दिन आयोजित करण्यात येणार आहे. यात प्रलंबित प्रकरणांचा आढावादेखील घेतला जाणार आहे. जिल्ह्यातील संबंधित विभागप्रमुखांनी आपल्या विभागांच्या प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेऊन त्याचा निपटारा करून त्या दिवशी आवश्यक त्या अहवालासह सकाळी ११ वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे.
------
फळबाग लागवडीचा लाभ घ्या
जळगाव : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना फळबाग लागवड कार्यक्रमातंर्गत फळबाग लागवडीचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या योजनेत आंबा, बोर, सीताफळ, आवळा, चिंच, जांभूळ, बांबू, मोसंबी, चिकू, डाळिंब, पेरू, कागदी लिंबू, शेवगा, साग, औषधी वनस्पती यासाठी अनुदान दिले जाणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असलेल्यांनी तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, पर्यवेक्षक, कृषी सहायक यांच्याकडे ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी केले आहे.