लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोना लस कशी द्यावी, कुठे व कशी ठेवावी याबाबततील आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्याचे जिल्हास्तरीय प्रशिक्षण पूर्ण झाले असून याचा दुसरा टप्पाही येत्या आठवडाभरात पूर्ण होणार आहे.
जिल्ह्यातील १९ हजार ७२७ आरोग्य कर्मचाऱ्यांना प्राथमिकस्तरावर लस देण्यात येणार आहे. यात १६ हजार ८०४ शासकीय आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. लस टोचताना काय परिधान करावे, गर्दी टाळावी, लस टोचताना घ्यावयाची काळजी, तिची साठवणूक क्षमता या सर्व बाबींबाबत कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. प्रत्येक केंद्रांवर कमीत कमी ५ कर्मचारी असे नियोजन असून एका आरोग्य केंद्रावर एका दिवसात शंभर आणि उपकेंद्रावर ५० असे लसीकरणाचे नियोजन आहे. एका दिवसात सर्व कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात येईल, असे नियोजन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.
अशी असेल क्षमता
लस कोणती येते, यावरून किती डोस द्यायचे हे ठरणार आहे. मात्र, सद्यस्थिती प्रत्येकाला किमान दोन डोस लसीचे द्यावे लागणार आहे. त्यामुळे जितके कर्मचारी त्याच्या दुप्पट डोस जळगावात आणावे लागणार आहे. उणे २६ डिग्रीवर हे डोस साठवणूक करावे लागणार आहे. त्यासाठी आरोग्य केंद्रामध्ये फ्रीजर असून यापेक्षा अधिक कमी तापमान लागत असल्यास मात्र, स्वतंत्र नियोजन करावे लागणार आहे. त्यामुळे एका दिवसातच हे लसीकरण आटोपण्याचे आरोग्य विभागाचे नियोजन आहे.