लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघातर्फे विविध रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली होती. मात्र जाहिरात काढल्यानंतर काही दिवसातच ही भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ प्रशासनाने घेतला आहे. आधी ही भरती प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येणार होती. मात्र आता दूध उत्पादक संघाने ही भरती प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने घेण्यात यावी असे आदेश काढल्याने आधी ची भरती प्रक्रिया रद्द करून ती आता नव्याने काढण्यात येणार असल्याची माहिती दूध उत्पादक संघाचे कार्यकारी संचालक मनोज लिमये यांनी '' लोकमत '' ला दिली.
७ एप्रिल रोजी जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने आपल्याकडे रिक्त असलेल्या ७८ जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली होती. दूध संघात गेल्या काही वर्षांपासून अनेक जागा रिक्त आहेत. संचालक मंडळाच्या बैठकीत देखील अनेक वेळा भरतीप्रक्रिया राबविण्याबाबत निर्णय झाले होते. त्यानुसार अखेर दूध संघाने जाहिरात प्रसिद्ध करून रिक्त जागा भरण्याबाबत तयारी सुरू केली होती. मात्र सोमवारी दूध संघातर्फे ही भरती प्रक्रिया रद्द करण्यात आली असल्याचे प्रसिद्ध करण्यात आले आहे. या भरती प्रक्रियेत एकूण ७८ जागा भरण्यात येणार होत्या, यामध्ये वेगवेगळे विभागांसाठी तब्बल ३० अधिकाऱ्यांची भरती करण्यात येणार आहे. तर सहाय्यक पदासाठी २४ जागा भरण्यात येणार आहेत. यासह टेक्निशियन, इलेक्ट्रिशियन, पंप ऑपरेटर, फिटर, वेल्डर व मशीन ऑपरेटर या पदासाठी देखील काही जागा भरती करण्यात येणार आहेत.
ऑनलाइन पद्धतीने करण्यात येणार भरती
७ एप्रिल रोजी दूध उत्पादक संघाकडून काढण्यात आलेल्या जाहिरातीत भरती प्रक्रिया ही ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येणार होती. मात्र, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता ही भरती प्रक्रिया ऑफलाइन घेणे धोक्याचे असल्याने संचालक मंडळ व प्रशासनाने ही भरती प्रक्रिया ऑनलाइन घेण्याबाबत सूचना दिल्याची माहिती दुध फेडरेशन मधील सुत्रांनी दिली आहे. दरम्यान या बाबत आता नव्याने जाहिरात प्रसिद्ध केली जाणार असल्याची माहिती दूध संघाचे कार्यकारी संचालक मनोज लिमये यांनी दिली आहे. तसेच ऑनलाईन परीक्षेसाठी स्वतंत्र एजन्सी नेमण्यात येणार आहे. या एजन्सीद्वारे ही सर्व भरती प्रक्रिया पार पाडण्यात येणार असल्याचीही माहिती लिमये यांनी दिली. यासाठी लवकरच नव्याने जाहिरात प्रसिद्ध केली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
दुधाच्या मागणीत ३० टक्के घट
जिल्हाभरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्हा प्रशासनाने गेल्या महिनाभरापासून कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यातच आता राज्य शासनाने देखील नवीन नियमावली जाहीर करून, लॉक डाऊन जाहीर केले आहे. यामुळे दूध संघातून वितरित होणाऱ्या दुधाचा मागणीत मोठी घट झाली आहे. यामुळे दूध फेडरेशन मध्ये मोठ्या प्रमाणात दुधाचा साठा पडून आहे. दुध फेडरेशन मध्ये दररोज ३ लाख ५० हजार लीटर दूध जिल्हाभरातून जमा होत असते. तसेच दुध फेडरेशन च्या माध्यमातून १ लाख ६० हजार लीटर दुधाची विक्रीही केली जात असते. तर उर्वरित दुधाचा वापर दूध पावडर तयार करण्यासाठी दूध फेडरेशन कडून होत असतो. मात्र, सद्यस्थितीत अनेक दुकाने व दुधाचे बूथ बंद असल्याने दूध फेडरेशन कडून होणाऱ्या विक्रीत ३० टक्के घट झाली आहे. यामुळे दुध फेडरेशन मध्ये २० ते ३० हजार लीटर दूध दररोज पडून आहे. यामुळे आता दूध पावडर तयार करण्यावर दूध उत्पादक संघाने भर दिला असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.