पालकमंत्री यांची माहिती : आजपासून पुन्हा लसीकरणाला होणार सुरुवात
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव / पारोळा : कोविडच्या प्रतिकारातील सर्वांत महत्त्वाचे आयुध मानल्या जाणाऱ्या लसींचा तुटवडा असताना जळगाव जिल्ह्याला २५ हजार लसींचा साठा प्राप्त झाला आहे. सोमवारपासून पुन्हा लसीकरण सुरू करण्याबाबत निर्देश देण्यात आले असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.
पारोळा तालुक्यातील तामसवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला रविवारी पालकमंत्र्यांनी अचानक भेट दिली. त्याप्रसंगी त्यांनी ही माहिती दिली. याप्रसंगी माजी आमदार डॉ. सतीश पाटील यांचीदेखील उपस्थिती होती. पालकमंत्र्यांनी कोविडच्या प्रतिकारासाठी आरोग्य केंद्रात करण्यात येत असलेल्या उपाययोजनांना आढावा घेतला. शासनाने आखून दिलेल्या नियमांचे येथे पुरेपूर पालन होते की नाही ? याबाबतची माहिती त्यांनी जाणून घेतली. रुग्ण आणि त्यांच्या आप्तांकडून समस्या जाणून घेत संबंधितांना याबाबत जाब विचारत त्यांचे निराकरण केले. डॉ. सतीश पाटील यांनी आरोग्य केंद्रासह मतदारसंघातील विविध समस्या पालकमंत्र्यांकडे मांडल्या.
बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण अधिक
आता बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या ही जास्त असल्याचे सकारात्मक चित्र दिसून येत आहे, तर बाधितांची संख्यादेखील आधीच्या तुलनेत थोडी कमी आढळून येत आहे. तर, जिल्ह्यात कोरोनाच्या लसीचा तुटवडा असल्याने आपण आरोग्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर जळगाव जिल्ह्यासाठी २५ हजार लसींचा साठा प्राप्त झाला असल्याची माहितीदेखील पालकमंत्री यांनी रुग्णालयाच्या भेटीप्रसंगी दिली. राज्य शासनाने जाहीर केलेल्या कडक निर्बंधांचे जनतेने पालन करण्याचे आवाहनदेखील पाटील यांनी केले.