लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गाचे काम अजूनही अंतिम टप्प्यात आलेले नाही. या महामार्गाच्या कामांना कधीच सुरुवात झाली आहे. त्यातील बहुतेक कामांची मुदत संपत आली असली तरी ही कामे अद्याप अंतिम टप्प्यात आलेली नसल्याचे दिसून येत आहे. जळगाव शहराच्या बाहेरून जाणाऱ्या तरसोद ते फागणे या रस्त्याचे काम अजूनही फक्त ३५ टक्केच झाल्याचे समोर आले आहे. हे काम संथ गतीने केल्याबद्दल या ठेकेदाराला महामार्ग प्राधिकरणाने या कामासाठी दंडदेखील ठोठावला आहे; तर फर्दापूर ते जळगाव; चाळीसगाव ते पाचोरा आणि पाचोरा ते जळगाव हे काम भूसंपादनाअभावी अपूर्ण राहिले आहे.
केंद्रात भाजपचे सरकार आल्यानंतर जिल्ह्यात सर्वच प्रमुख रस्त्यांच्या चौपदरीकरणाच्या कामाला सुरुवात झाली. त्यानंतर जिल्ह्यातील ही कामे लवकर पूर्ण होतील असा अंदाज होता. मात्र यातील बहुतांश कामे ही मुदत जवळ आली तरी पूर्ण झालेली नाहीत.
जळगाव ते फर्दापूर हे काम ४९ किलोमीटर आहे. त्याची किंमत ३९९ कोटी रुपये आहे. त्याची मुदत जून महिन्यापर्यंत आहे. हे काम जवळपास ९२ टक्के पूर्ण झाले आहे. गाडेगावच्या घाटात भूसंपादनाचे काम अपूर्ण राहिले आहे. जळगाव ते चाळीसगाव या रस्त्याचे दोन टप्पे आहेत. याचे जवळपास १२ टक्के काम अपूर्ण आहे. मात्र तेथेदेखील भूसंपादनाचे काम सुरू आहे. जळगाव प्रांताधिकाऱ्यांनी त्यासाठीची प्रक्रियाही सुरू केली आहे.
जळगाव शहरातील महामार्ग चौपदरीकरणाचे काम खोटेनगर ते कालिका माता चौफुलीपर्यंत ८ कि.मी.चे आहे. त्यात ६२ कोटी किंमत असून त्याची मुदत मार्चपर्यंत होती. मात्र कोविडच्या लॉकडाऊनमुळे ९० दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यात ६ जून २०२१ ही मुदत आहे.
चिखली ते तरसोद हे अंतर ६२.७ कि.मी.चे आहे. त्याची किंमत १०४८ कोटी रुपये आहे. हे काम ८२ टक्के पूर्ण झाले आहे; तर बहुचर्चित आणि प्रतीक्षेत असलेला तरसोद ते फागणे हा मार्ग ८७.३ कि.मी.चा आहे. त्याची किंमत १०२१ कोटी असून त्याची मुदत आता जानेवारी २०२२ आहे. हे काम आता ३५ टक्के पूर्ण झाले असल्याची माहिती समोर आली आहे.