लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव : जिल्ह्याची तहान भागविणारे गिरणा धरण यावर्षी केवळ ५७ टक्के भरल्याने डिसेंबर ते जून २०२४ या चार महिन्याच्या कालावधीत बिगर सिंचनासाठी गिरणा धरणातून चार आवर्तने सोडण्याबाबतचा निर्णय कालवा सल्लागार व आकस्मिक पाणी आरक्षण समितीच्या बैठकीत घेण्यात आला. कालवा प्रणालीचा नूतनीकरणाचा प्रस्ताव शासनास सादर करावा, तसेच भविष्यातील पाणीटंचाई उपाययोजनांबाबत सूक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिले.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी ही बैठक तापी पाटबंधारे विकास महामंडळाच्या सभागृहात घेण्यात आली. जळगाव जिल्ह्यात हतनूर, गिरणा आणि वाघुर हे तीन मोठे प्रकल्प असून यावर १३८ गावे अवलंबून आहेत. तर, बोरी, भोकरबारी, मन्याड, अंजनी, अग्नावती, बहुळा, तोंडापूर, हिवरा आणि गूळ या मध्यम प्रकल्पांवर १०१ गावे अवलंबून आहेत. तर ४० लघु प्रकल्पांचा १४३ गावांना लाभ होतो. अर्थात, तिन्ही प्रकारातील प्रकल्पांचा जिल्ह्यातील ३८२ गावांना लाभ होतो. या सर्व प्रकल्पांमधील विभागाने सुचविल्याप्रमाणे पाणी आरक्षणाला या बैठकीत मान्यता प्रदान करण्यात आली.बिगर सिंचन पाणी वापर
गिरणा प्रकल्पांतर्गत पिण्यासाठी अवलंबून असणाऱ्या संस्थांमध्ये मालेगाव महानगरपालिका, चाळीसगाव, भडगाव व पाचोरा नगरपालिका तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या २ योजनांचा समावेश आहे. चाळीसगाव, भडगाव, पाचोरा व एरंडोल तालुक्यातील १५४ गावांचाही समावेश आहे. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पाण्याची बचत करून विभागाने पाणीटंचाईबाबत सूक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश दिले.
पाणीटंचाईचा घेतला आढावासद्यस्थितीत अमळनेर, पारोळा, चाळीसगाव व पाचोरा या तालुक्यात पाणीटंचाई जाणवण्याची शक्यता आहे. याबाबत आवश्यक त्या ठिकाणी तात्पुरत्या पाणीपुरवठा योजना कार्यान्वित कराव्या. तसेच तालुकानिहाय बैठका घेऊन पंधरा दिवसात पाणीटंचाई आराखडा जिल्हास्तरावर पाठविण्याचे निर्देश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिले.
या बैठकीला आमदार चिमणराव पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, अधीक्षक अभियंता आणि प्रशासक लाभक्षेत्र विकास प्राधिकरण एस. डी. दळवी, कालवा सल्लागार समिती सदस्य दत्तू जगन्नाथ ठाकूर, निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार, पाटबंधारे विभागाचे अदिती कुलकर्णी, मध्यम प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता विनोद पाटील, मजीप्रा अधीक्षक अभियंता नलावडे, कार्यकारी अभियंता एस.सी. निकम, जि.प. पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता जी. एस. भोगवडे, उपकार्यकारी अभियंता सुभाष चव्हाण, सिद्धार्थ पाटील, विजय जाधव व सर्व क्षेत्रीय अधिकारी यांची उपस्थिती होती.