जळगाव : नियमबाह्य औषध खरेदी, ई-टेंडरींगमध्ये घोळ यासह विविध ठपके ठेवत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ बबिता कमलापूरकर यांना कार्यमुक्त करण्याचा ठराव सोमवारी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधरण सभेत करण्यात आला़ उपाध्यक्षांसह सदस्यांनी आक्रमक भूमिका मांडत, रोष व्यक्त केला़ श्वान दंशावरील खर्च कमी करण्यात आल्याच्या मुद्यावरून गोंधळाला सुरूवात होऊन अखेर हा ठराव करण्यात आला. आपण सकारात्मक कामे केली आहेत ती कामे नियमानुसारच असल्याचे डॉ़ कमलापूरकर यांनी म्हटले आहे़ अनेक सदस्यांनी आक्रमक होत एकाच वेळी प्रश्नांचा भडीमार केल्यानंतर आपण मला बोलू दिल तर म्हणणं मांडता येईल, असे डॉ़ कमलापूरकर यांनी म्हणताच उपाध्यक्ष संतप्त झाले व आपल्याकडे पुरावे आहेत, कारवाईची मागणी दोन महिन्यांपूर्वीच केली आहे, त्याचे काय झाले, अशी विचारणा उपाध्यक्ष महाजन यांनी सीईओंकडे केली व सर्व सदस्यांच्या आरोग्य अधिकाºयांविरोधात तक्रारी असल्याचे सांगत अखेर कार्यमुक्तीचा ठराव करण्यात आला़ सदस्य नाना महाजन यांनी श्वानदंशावरील लसीसाठी असलेल्या निधी व २८ लाखांच्या आरोग्य सेवेवरील खर्चाबाबत विचारणा केल्यानंतर अनेक सदस्यांनी विविध मुद्यांवरून संताप व्यक्त केला. यावरुन गोंधळ उडाला. या गोंधळात डॉ.कमलापूरकर यांनी आपल्याला बोलू द्यावे, अशी विनंती केली. यानंतर अधिकच गोंधळ वाढला. नियमबाह्य कुठलीही औषधी खरेदी झालेली नाही, ई टेंंडरींगमध्येही घोळ नाही, ती अर्थ विभागाकडून ओके होऊनच सीईओंकडे जाते़ श्वानदंशावरील लसीबाबतचा निर्णय आरोग्य समितीचा होता़ त्याचे आपल्याकडे मेरिट्स आहेत. -डॉ़ बबिता कमलापूरकर, जिल्हा आरोग्याधिकारी
जळगाव जिल्हा आरोग्य अधिका-यांच्या कार्यमुक्तीचा जि.प.चा ठराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 12:17 PM