जळगाव : जिल्ह्यात सुमारे दोन हजार रुग्णांना अतिदक्षता विभागात उपचार घ्यावे लागत आहे. यापैकी सुमारे हजार रुग्णांचा दहा टक्क्यांपेक्षा अधिक एचआरसीटी रिपोर्टचा स्कोर आहे. अशा रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शनची आवश्यकता भासत होती. त्यासाठी रुग्णांच्या नातेवाइकांची वणवण सुरू होती. अखेर आता ही वणवण थांबणार आहे. खासदार उन्मेश पाटील यांच्या पाठपुराव्यानंतर गुरुवारी जिल्ह्यासाठी एक हजार रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा होणार आहे. यामुळे पाचशेपेक्षा अधिक गंभीर रुग्णांना जीवनदान मिळणार आहे.
गेल्या आठ ते दहा दिवसांपासून जिल्ह्यात रेमडेसिविर इंजेक्शनचा सातत्याने तुटवडा जाणवू लागला होता. एकीकडे एचआरसीटी केलेल्या रुग्णांचा स्कोर दहापेक्षा अधिक असलेल्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असताना रुग्णांच्या नातेवाइकांमध्ये व संबंधित कोविड केअर सेंटर डॉक्टरांमध्ये चिंता व्यक्त केली जात होती. या गंभीर परिस्थितीची खासदार उन्मेश पाटील यांनी मायलन कंपनीच्या संचालकांशी तसेच ड्रग कंट्रोलर ऑफ इंडिया व्ही.जी. सोमाणी यांना माहिती देऊन पाठपुरावा घेतला. अखेर या कंपन्यांकडून तातडीने एक हजार रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा केला जाणार आहे.