१० ऑक्सिजन प्लांटसाठी लवकरच सर्वेक्षण : आमदार गिरीश महाजन यांनी घेतली एफडीए आयुक्तांची भेट
जळगाव : राज्यातील रुग्णांसाठी सिपला कंपनीतर्फे ३५ हजार रेमडेसिविर इंजेक्शन्स उपलब्ध करण्यात आले असून यातून रुग्णांच्या संख्येनुसार योग्य साठा जळगाव जिल्ह्याला उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त परिमल राजीव यांनी दिली आहे. आमदार गिरीश महाजन यांनी गुरुवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह आयुक्त राजीव यांची भेट घेऊन जिल्ह्याच्या परिस्थितीबाबत चर्चा केली. दरम्यान, पीएम केअर फंडातून १० ऑक्सिजन प्लांटला मंजुरी देण्यात आल्याचे व लवकरच याचे सर्वेक्षण होणार असल्याचे आमदार गिरीश महाजन यांनी सांगितले.
जिल्ह्याला रुग्णसंख्येच्या प्रमाणात योग्य इंजेक्शन उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी या बैठकीत आमदार महाजन यांनी केली. दरमयान, लवकर ऑक्सिजन प्लांटचे सर्वेक्षण होणार असून यामुळे जिल्ह्यातील रुग्णांना पुरेसे प्राणवायू मिळणार आहे. दुसरीकडे कोरेाना रुग्णांच्या तपासणी अहवालास विलंब होत असल्याने याबाबत कार्यवाही करण्याचीही मागणी यावेळी आमदार महाजन यांनी केली. बैठकीला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर उपस्थित होते. दरम्यान, आम्ही न घाबरता मैदानात असून सत्ताधारी पक्षाचे मंत्री व आमदार हे मात्र होम आयसोलेशनमध्ये असल्याची टीका आमदार गिरीश महाजन यांनी केली आहे. आता तरी शुद्धीवर येऊन रुग्णसेवा करावी, असेही त्यांनी म्हटले आहे.