चोपडा : तालुक्यातील अकुलखेडा येथील सरपंच हर्षल रोहिदास सोमवंशी यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव दहा विरुद्ध एक अशा मतांनी मंजूर करण्यात आला. एकूण १३ सदस्यसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीत अविश्वास ठरावाच्या बाजूने दहा सदस्यांनी मतदान केले तर सरपंच हर्षल रोहिदास सोमवंशी यांनी अविश्वास ठरावाच्या विरोधात मतदान केले. यावेळी एक ग्रामपंचायत महिला सदस्य गैरहजर तर एक सदस्या तटस्थ होती.अकुलखेडा ग्रामपंचायत सरपंच हर्षल सोमवंशी ग्रामपंचायतीच्या कारभारात सदस्यांना विश्वासात घेत नसून, स्वच्छ भारत अभियान व गावविकासाची कामे करीत नाहीत. मासिक सभेत सदस्यांना हिशोब देत नाहीत आदी कारणांस्तव विष्णू बुकन चौधरी, किशोर भिका पाटील, स्वप्ना प्रदीप महाजन, रुपाली सतीश बोरसे, विजया दीपक पाटील, संदीप एकनाथ पाटील, लक्ष्मण उत्तम कोळी, नितीन जगन्नाथ पाटील, शरद काशिनाथ महाजन, योगिता जितेंद्र पाटील या दहा ग्रामपंचायत सदस्यांनी त्यांच्या विरुद्ध तहसीलदार अनिल गावित यांच्याकडे अविश्वास ठराव दाखल केला होता. अविश्वास ठरावावर २८ रोजी सकाळी ११ वाजता येथील ग्रामपंचायतीत तहसीलदार गावित यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेत चर्चा करण्यात येऊन मतदान घेण्यात आले. अविश्वास ठरावाच्या बाजूने दहा सदस्यांनी मतदान केले. तर विरोधात सरपंच सोमवंशी यांनी मतदान केले. सदस्या राधा दिलीप अहिरे गैरहजर होत्या तर उषा महाजन या तटस्थ राहिल्या. ठरावाच्या बाजूने दहा सदस्यांनी मतदान केल्याने अविश्वास ठराव मंजूर करण्यात आल्याची माहिती तहसीलदार गावित यांनी दिली.याकामी निवडणूक शाखेचे लिपिक सुरेश पाटील, ग्रामविकास अधिकारी आर.ई. विसावळे व लिपिक अमोल महाजन यांनी सहकार्य केले.