जळगाव: महापालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव म्हणजे नौटंकी असून दबावतंत्राचा भाग असल्याची टीका आमदार एकनाथ खडसे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली. मनपा निवडणुकीच्या वेळी जळगाव चकाचक करुन दाखवू असे म्हणणारे गिरीश महाजन यांनी 'कुठं नेऊन ठेवलंय जळगाव' अशी म्हणण्याची वेळ आली आहे.
शहरात ९० टक्के रस्त्याची कामे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून सुरू आहेत. मनपाची परवानगी, आयुक्तांची सही यासह इतर कटकटी नको म्हणून गैरव्यवहार करण्याचा उत्तम मार्ग बांधकाम विभाग आहे. निविदेत हेराफेरी, अंदाजपत्रक वाढविता येतात. एकाच मक्तेदाराला कामे कशी मिळतात, तोच कसा नियमात बसतो असा सवाल खडसे यांनी केला. कचर्यात माती, दगड भरून वजन वाढवले जाते. यासंदर्भात आयुक्तांकडे वारंवार तक्रारी झाल्या आहेत तरी देखील कारवाई होत नाही. वाॅटरग्रेसचा मक्ता कोणाचा आहे. झालेल्या कामांवरच परत एनओसी आयुक्तांकडून दिली जात नाही हेच अविश्वासाचे मुळ कारण आहे.
आम्ही ठरावाच्या विरोधात आहोत, पण याचा अर्थ असा नाही की आयुक्तांचे काम चांगले आहे. त्यांचे कामही असमाधानकारकच आहे. हा ठराव संमत होऊच शकत नाही असा दावाही खडसे यांनी केला. जनतेसमोर आम्ही स्वच्छ आहोत असे दाखविण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. आयुक्तांच्या बदलीला मॅटची अडचण नाही. जिल्ह्यात तीन कॅबिनेट मंत्री आहेत त्यांच्याकडून बदली होऊ शकत नाही का? अविश्वासाच्या नावाने आयुक्तांचे रेकॉर्ड खराब करु असा दम दिला जात आहे. तीन्ही मंत्री अकार्यक्षम असून सरकार दरबारी त्यांची किंमत शून्य असल्याची टीका त्यांनी केली.