भडगाव : जुलै ते डिसेंबर २०२० या कालावधीत तालुक्यातील एकुण ३३ ग्रामपंचायतींची पंचवार्षीक मुदत संपत आहे. या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचना व आरक्षण कार्यक्रम तहसिल निवडणूक विभागाने जाहीर केला असून प्रशासन कामाला लागले आहे.राज्य निवडणूक आयुक्तांच्या आदेशानुसार तालुक्यात २० डिसेंबर २०१९ ते २१ मार्च २०२० दरम्यान हा कार्यक्रम चालणार आहे. तालुक्यात एकुण ३३ ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचना व आरक्षण कार्यक्रमासाठी नियोजनास संबंधीत गावाचे तलाठी, ग्रामसेवक आदिंची नेमणूक तालुका प्रशासनाने केली आहे, अशी माहीती तहसिल विभागाच्या सुत्रांनी दिली. या ग्रामपंचायत प्रभाग रचना व आरक्षण नियोजनासंदर्भात तहसिल कार्यालयात नुुकतीच तहसिलदार माधुरी आंधळे यांनी प्रशिक्षण बैठक घेऊन संबंधीत अधिका-यांना मार्गदर्शन केले. यावेळी निवासी नायब तहसिलदार रमेश देवकर, गटविकास अधिकारी अमोल जाधव, मंङळ अधिकारी, विस्तार अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक आदी कर्मचारी उपस्थित होते. त्यानुसार तालुक्यात ३३ ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचना व आरक्षण नियोजन करुन शासनस्तरावर कामाची लगबग सुरु झालेली आहे.२० डिसेंबर रोजी गावांचे नकाशे अंतिम करणे, ३० जानेवारी रोजी प्रभाग रचना व आरक्षणाला समितीने मान्यता देणे, ५ फेब्रुवारीला विशेष ग्रामसभेची सुचना देणे. आरक्षणची सोडत काढण्याकरीता ४ फेब्रुवारीला विशेष ग्रामसभा बोलावून प्रारुप रचनेवर आरक्षणाची सोडत काढणे, २१ मार्च रोजी जिल्हाधिकारी यांनी मान्य केलेल्या अंतिम प्रभाग रचनेला नमुना अ मध्ये व्यापक प्रसिद्धी देणे, असा कार्यक्रम असल्याची माहिती निवडणूक विभागाचे लिपीक विनोद माळी यांनी दिली.