लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : भाजपचे अधिकृत गटनेते कोण? याबाबतचा निर्णय घेण्यास विभागीय आयुक्तांनी स्पष्ट नकार दिला असून, गटनेते ठरवण्याचा अधिकार आपल्याला नसल्याचे सांगत वारंवार मनपा प्रशासनाने पत्र व्यवहार करू नये, असे ठणकावून मनपा आयुक्तांनी याबाबत निर्णय घ्यावा, अशा सूचना विभागीय आयुक्तांनी दिल्या आहेत. याबाबत विभागीय आयुक्तांनी मनपा आयुक्तांना पत्र पाठवून यावर निर्णय घेण्यास नकार दिला आहे.
मार्च महिन्यात झालेल्या महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीदरम्यान, भाजपच्या २७ नगरसेवकांनी भाजपच्या विरोधात जाऊन शिवसेनेच्या महापौर पदाच्या उमेदवाराला मतदान दिले होते. तसेच याबाबत स्वतंत्र गट तयार करण्याचा दावा भाजपच्या बंडखोर नगरसेवकांनी केला होता. त्यानंतर भाजपचे अधिकृत गटनेते भगत बालाणी यांना पाय उतार करत ॲड. दिलीप पोकळे यांची भाजपच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली होती; मात्र भाजपने यावर आक्षेप घेऊन भगत बालाणी हेच भाजपचे अधिकृत गटनेते असल्याचे सांगितले होते. त्यावर निर्णय घेण्याबाबत मनपा प्रशासनाने विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव पाठवला होता. तब्बल दीड महिन्यानंतर विभागीय आयुक्तांनी याबाबत निर्णय घेण्यास नकार दिला आहे.
मनपा आयुक्तांना घ्यावा लागेल निर्णय
विभागीय आयुक्तांनी गटनेतेबाबत निर्णय घेण्यास नकार दिल्यामुळे याबाबत मनपा आयुक्तांकडे आहे. त्यातच पुढील महिन्यात स्थायी समिती सभापती पदाची निवडणूक होणार आहे. यासाठी भाजपचा अधिकृत गटनेता ठरवावा लागणार असून, मनपा आयुक्त याबाबत तेव्हा निर्णय घेतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण भाजप व भाजप बंडखोर अजूनही गटनेतेबाबत आपल्याकडेच हे पद असल्याचा दावा करत आहेत.
मनपा आयुक्तांनी मार्गदर्शन मागवण्याची गरज नव्हती
मनपा आयुक्तांनी याबाबत तत्काळ निर्णय घेणे अपेक्षित होते. विभागीय आयुक्तांकडूनच भाजपच्या अधिकृत गटनेतेपदी भगत बालाणी यांची निवड झाली होती. पुढील महिन्यात आता स्थायी समिती सभापती पदासाठी निवडणूक होणार असल्याने केवळ निर्णयासाठी ही निवडणूक प्रलंबित ठेवण्यात येऊ नये, असे मत माजी स्थायी समिती सभापती तथा विधी समिती सदस्य ॲड.शुचिता हाडा यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.