जळगाव : दोघांच्या जबाबदारीने घर कुटुंब व्यवस्था टिकवता येते. सहनशीलता व समजंसपणा दोघांमध्ये असणे गरजेचे आहे. मात्र, मुलींची सहनशीलता कमी झाल्याने घटस्फोटाचे प्रमाण वाढले आहे. असे मत नागपूर येथील ज्येष्ठ लेखिका तथा कवयित्री प्रा. विजया मारोतकर यांनी रविवारी व्यक्त केले.श्री संत शिरोमणी सावता माळी प्रतिष्ठान आणि माळी समाज पंच मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात सकाळी वधु-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर भाजपा ओबीसी मोर्चाच्या प्रदेश सचिव शालिनी बुंधे, शिवसेना जिल्हा संघटक गुलाबराव वाघ, अध्यक्ष विजय महाजन, उपाध्यक्ष जयंत इंगळे, सचिव शरद मोरे आदी उपस्थित होते. मेळाव्यासाठी राज्याभरासह मध्यप्रदेश, गुजराथ येथुन मोठ्या संख्येने समाजबांधव सहभागी झाले होते. यापुढे लेखिका मारोतकर यांनी सांगितले की, समाजामध्ये मुलांचे व्यासनाधीन होण्याचे प्रमाण वाढले असून, मुलींनी घरातून निघुन जाण्याचेही प्रमाण वाढले आहे. मुलींची सुरक्षा ही मुलांवर सुद्धा अवलंबुन असून, त्यांनी मुलींचा आदर केला पाहिजे. तसेच समाजाशी आपण काही तरी देणं लागतो,याचा विचार करुन समाजाची परतफेडं करणे गरजेचे असल्याचे सांगित, मुलींनी मोबाईलाचा अतिरेक टाळणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले. या मेळाव्यात ४३१ जणांनी परिचय दिला. प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय महाजन, उपाध्यक्ष जयंत इंगळे यांच्यासह संचालक प्रकाश साबळे, संजय महाजन, गोपाळ चौधरी, वैशाली महाजन, धनराज माळी, डी. बी. महाजन, वाय. एस. महाजन आदी समाज बांधवांनी परिश्रम घेतले.
सहनशीलता कमी झाल्याने घटस्फोट वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2019 10:03 PM