भुसावळ, जि.जळगाव : शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा व काहींमध्ये आर्थिक परिस्थिती बघून फेरबदल करण्यात यावे या मागणीसाठी दिव्यांग बांधवांनी सोमवारी प्रांत कार्यालयासमोर उपोषण केले.पाच टक्के निधी अपंगाच्या खात्यामध्ये जमा करावी, घरकुल योजनेचा लाभ मिळावा, संजय गांधी योजनेच्या बँक खात्याची किमान रक्कम शून्य करावी, अंत्योदय योजनेचा लाभ मिळावा, अपंग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, पालिकेची जागा व्यवसाय करता मिळणे, बँक कर्ज मिळावे, पालिकेच्या करमध्ये सवलत मिळावी, कलम ४० नुसार राज्यातील सर्व पालिकाच्या अर्थसंकल्पात दारिद्र्य निर्मूलन कार्यक्रमांतर्गत दिव्यांगांसाठी तीन टक्के निधी राखीव ठेवावा तसेच कलम ४२, ४३ च्या तरतुदीनुसार दिव्यांगासाठी सहाय्यभूत उपकरणे पुरवणे, त्याच्याकरिता घरकुल योजना, व्यवसाय, मनोरंजन, विविध शाळा, संशोधन केंद्र आदी मागण्यांसाठी उपोषण करण्यात आले. यासंबंधीच्या निवेदननावर शेख इदरीस बागवान, शेख वसीम बागवान, पंकज जैन, धमेंद्र्र जैन, वसीम खान, नीलम सोनपुरे, शशिकांत रायमडे, रमेश देवकरण, तुषार महाजन आदींच्या सह्या आहेत.