गैरसोय : महिलांसाठी असलेला स्वतंत्र डबाही बंद
रेल्वेच्या निर्णयामुळे दिव्यांगांमध्ये नाराजी
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गेल्या अनेक वर्षांपासून सर्व प्रकारच्या एक्स्प्रेस गाड्यांना दिव्यांग बांधव व महिलांसाठी स्वतंत्र डबा लावण्यात येत असतो. यामुळे विशेषतः दिव्यांग बांधवांचा मोठा त्रास वाचतो. मात्र, रेल्वे प्रशासनाने गेल्या चार दिवसांपासून अचानक गोरखपूर काशी एक्स्प्रेसचा अचानक दिव्यांग महिलांसाठी असलेला स्वतंत्र डबा बंद केल्यामुळे या प्रवाशांमधून रेल्वेच्या या निर्णयामुळे तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
रेल्वे प्रशासनातर्फे प्रत्येक प्रवाशी रेल्वे गाडीला इंजिनाच्या बाजूला दिव्यांग बांधवांसाठी स्वतंत्र एक डबा व महिलांसाठीही स्वतंत्र डबा लावण्यात येत असतो. या डब्यातून फक्त संबंधित लाभार्थ्यांनाच प्रवासाची मुभा आहे. या डब्यामध्ये हाताने किंवा पायाने अपंग असलेल्या दिव्यांग बांधवांना त्यांच्या सोयीनुसार बसता येते. मात्र, रेल्वे प्रशासनाने गेल्या चार दिवसांपासून मुंबईकडून जळगावला येणाऱ्या (गाडी क्रमांक (०५०१७) या एक्स्प्रेसचा दिव्यांग व महिलांसाठी असलेला स्वतंत्र डबा काढल्याने या प्रवाशांना इतर डब्यात बसावे लागत आहे. विशेष म्हणणे यात दिव्यांग बांधवांचे सर्वाधिक हाल होत असून, त्यांना जनरल डब्यात कसेबसे खाली बसून प्रवास करावा लागत आहे.
इन्फो :
काशी एक्सप्रेसला अनेक वर्षांपासून दिव्यांग डबा असतांना, रेल्वे प्रशासनाने आताच का डबा बंद केला, हे माहित नाही. मात्र, हा डबा बंद केल्यामुळे माझ्यासह इतर दिव्यांग बांधवांचे हाल होणार आहेत. याबाबत मी रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना भेटणार आहे.
प्रवीण माने, दिव्यांग बांधव