ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. 30 - शंकरबाबा पापळकर यांच्या मानस कन्येच्या विवाह सोहळ्याचे पालकत्व स्वीकारुन या ‘मंगल’ विवाहास राष्ट्रीय महोत्सवाचे स्वरुप देण्याचे काम रोटरी क्लब जळगाव वेस्ट यांनी केले आहे, असे गौरोवोद्गार सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी व्यक्त केले.
स्व. अंबादास पंत वैद्य दिव्यांग बालगृह, वझ्झर, ता. अचलपूर (अमरावती) येथील शंकरबाबा पापळकर यांची 19 वी मानसकन्या दिव्यांग मंगल व योगेश यांचा विवाह सोहळा रविवारी जळगावात होणार आहे. या विवाह सोहळ्यास वधुवरांना आशीर्वाद देण्यासाठी मंत्री बडोले शहरात आले होते. यावेळी पद्मालय विश्रामगृहात आयोजित छोटेखानी कार्यक्रमात त्यांनी वधुवरांना पुष्पगुच्छ देऊन आशीर्वाद दिले. यावेळी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर, आमदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे, महापौर नितीन लढ्ढा, अपंग कल्याण आयुक्त नितीन पाटील, रोटरी क्लब जळगाव वेस्ट चे अध्यक्ष योगेश भोळे, डॉ. राजेश पाटील, अनिल कांकरीया, रमण जाजू आदी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना मंत्री बडोले म्हणाले की, 18 वर्षावरील दिव्यांगाचा सांभाळ करण्यासाठी कायदा होणे आवश्यक असून यासाठी राज्य शासन केंद्र शासनाकडे प्रस्ताव सादर करील. रंजल्या गांजल्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी शंकरबाबा पापळकर हे सतत प्रयत्नशील असल्याचे गौरोवोद्गार काढले. दिव्यांगाचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
दिव्यांगाचा विवाह सोहळा अनुकरणीय उपक्रम- ना.हंसराज अहिर
दिव्यांगाचा विवाह सोहळा हा रोटरी क्लब जळगाव वेस्ट चा उपक्रम अनुकरणीय असून या उपक्रमांमुळे दिव्यांगाच्या जीवनात परिवर्तन होण्यास मदत होणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी व्यक्त केले. शंकरबाबा पापळकर यांची 19 वी मानसकन्या चि. सौ.कां. मंगल व चि. योगेश यांचा विवाह सोहळ्यानिमित्त वधूवरांना आशीर्वाद देतांना ते बोलत होते.