जळगाव : दिव्यांग प्रमाणपत्र वितरण प्रक्रियेत सरकारने मोठा बदल केला असून त्यामध्ये दिव्यांग व्यक्तींची फिराफीर थांबून त्यांना आता घरबसल्या ‘स्मार्ट कार्ड’ स्वरुपातील प्रमाणपत्र मिळणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एन.एस. चव्हाण यांनी गुरुवारी दिली. याची अंमलबजावणी ३ आॅक्टोबरपासून राज्यात सर्वत्र झाली असून दर बुधवारी जिल्हा रुग्णालयात दिव्यांगांना गर्दीदेखील करावी लागणार नाही.या संदर्भात गुरुवारी जिल्हा रुग्णालयात पत्रकार परिषद झाली. या वेळी डॉ. चव्हाण यांच्यासह जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्राचे प्रमुख एस.पी. गणेशकर, मुकुंद सपकाळे उपस्थित होते.या वेळी माहिती देताना डॉ. चव्हाण म्हणाले की, राज्यात सद्य:स्थितीत दिव्यांग व्यक्तींना सहा प्रकारचे दिव्यांगत्व प्रकारचे प्रमाणपत्र वितरित करण्यात येत असून आता केंद्र सरकारने ‘दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६’ संमत केला असून या कायद्यानुसार २१ प्रकारच्या दिव्यांग प्रकारांचा समावेश करण्यात आला आहे. यासोबतच दिव्यांगांना आॅनलाइन नोंदणी करुन ‘युनिक आयडी’ कार्ड घरपोच देण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ नुसार दिव्यांगत्व तपासणी, मूल्यमापन व प्रमाणपत्र वितरणाबाबत शासनाने नवीन ‘एसएडीएम’ (सॉफ्टवेअर असेसमेंट फॉर डिसॅब्लिटी महाराष्ट्र) या संगणक प्रणालीचा वापर सुरु केला असून या प्रणालीद्वारे आता दिव्यांगांना नऊ ऐवजी एकवीस दिव्यांगत्वासाठी प्रमाणपत्र वितरित करण्यात येणार आहे. हे प्रमाणपत्र घेण्यासाठी नवीन व जुन्या सभासदांना आॅनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी झाल्यानंतर जिल्हा रुग्णालयातर्फे ज्या दिव्यांगांना प्रमाणपत्रासाठी बोलविण्यात येणार आहे, त्यांना मोबाईलवर संदेश पाठविण्यात येईल. यानुसार संबंधित दिव्यांगाने ठरवून दिलेल्या दिवशीच जाऊन आपली तपासणी करता येईल. यामुळे रुग्णालयात गर्दी देखील कमी होईल व संबंधित व्यक्तीचा वेळदेखील वाचणार आहे.ही प्रक्रिया झाल्यानंतर दिव्यांगास त्याचे स्मार्ट कार्ड स्वरुपातील प्रमाणपत्र पोस्टाद्वारे घरपोच मिळणार आहे.या प्रक्रियेची सुविधा जिल्हा रुग्णलयासह जिल्ह्यातील मुक्ताईनगर, चाळीसगाव, चोपडा येथील रुग्णालयातही करण्यात आली असून प्रक्रियेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात दोन हजार जणांची नोंदणी झालेली आहे. यातील ज्यांना संदेश मिळेल, त्यांनी बुधवारी जिल्हा रुग्णालयात यावे, असे आवाहन डॉ. एन.एस. चव्हाण यांनी केले आहे.
दिव्यांगांना मिळणार घर बसल्या प्रमाणपत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2018 12:20 PM
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एन.एस. चव्हाण यांची माहिती
ठळक मुद्देनवीन प्रणाली ‘एसएडीएम’ संगणक प्रणाली