भुसावळ : लक्ष्मीपूजनानिमित्त सर्वत्र मोठ्या उत्साहात लक्ष्मी पूजन करण्यात आले. व्यापारी बांधवांनी खतावण्यांचे पूजन करून हिशेबाच्या नवीन वर्षाच्या कामकाजाचा शुभारंभ केला. फटाक्यांची आतशबाजीही जोरदार झाली.यंदाच्या वर्षी कोरोनाचे संकट असले तरी बाजारपेठेत गेल्या काही दिवसांपासून रोजच गर्दी दिसून येत आहे. शनिवारी लक्ष्मीची मूर्ती व फोटो, पूजेचे साहित्य तसेच फूल व हार घेण्यासाठी सकाळपासून ते दुपारपर्यंत खूपच गर्दी दिसून आली. संध्याकाळी केरसुणीचे पूजनही लक्ष्मी पूजनासोबत झाले. व्यापारी बांधवांनी दुकान व घरी अशा वेगवेगळ्या पूजा केल्या. यानिमित्त अनेक दुकानांसमोर तसेच घरांसमोर रांगोळी काढून दीप प्रज्वालित करण्यात आले. लक्ष्मी पूजनानंतर काही व्यापारी बांधवांनी तसेच त्यांच्या कुटुंबीयांनी फटाक्यांची आतशबाजी केली. शहरातील दाणाबाजारातील प्रत्येक व्यापारी प्रतिष्ठानमध्ये लक्ष्मी पूजन करण्यात आले. व्यापारी बांधवांसोबत श्रीमंत, मध्यमवर्गीय तसेच गोरगरिबांनी आपापल्या परिने पूजनाचा कार्यक्रम केला. प्रत्येक घरात कुटुंबातील सदस्यांनी मनोभावे पूजा केली. यावेळी साळीच्या लाह्या, बत्ताशे, धने व गूळ व मिठाईचा नैवेद्य दाखविण्यात आला. सर्वत्र पणत्या, रोशणाई आणि कंदिलाचा लखलखाट दिसून आला. फटाक्यांची आतषबाजीलक्ष्मी पूजनानंतर कोरोनाला न जुमानता रात्री सर्वत्र फटाक्यांची जोरदार आतषबाजी झाली. फुलझडी, चक्री, आकाशात झेपावणाऱ्या उंच फटाक्यांमुळे आसमंत उजळून निघाला होता. कोरोनाचे सावट असले तरी दिवाळीचा उत्साहापुढे हे सावट फिकेच पडले होते. दरम्यान दिवाळीमुळ्य गेल्या काही दिवसांमध्ये बाजरपेठेत तेजी निर्माण झाल्याने व्यापारीही खुष आहेत.
आतषबाजीसह दीपावलीचा झगमगाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2020 10:10 PM