जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीने वार्षिक नियोजनानुसार दिवाळी / हिवाळी सुट्या दि. १७ ते ३१ डिसेंबर २०२३ दरम्यान जाहीर करण्यात आलेल्या आहेत. तसेच दिवाळीच्या पाच दिवस सुट्ट्या आहेत. मात्र, या दोन्ही सुट्या सलग देण्यात याव्यात, अशी मागणी एन.मुक्ता.च्या वतीने केंद्रीय अध्यक्ष प्रा. डॉ. नितीन बारी यांच्या नेतृत्वात विद्यापीठाकडे करण्यात आली आहे.
विद्यापीठाकडून दिवाळीच्या सुट्ट्या दोन टप्प्यांमध्ये प्राध्यापकांना दिल्या जाणार आहेत, मात्र त्या सलग देण्यात याव्यात, अशी मागणी आहे. पूर्वी १ ते २५ नोव्हेंबर सलग सुटी मिळायची. दिवाळी दरम्यान विद्यार्थ्यांची परीक्षा आणि सुट्ट्यांचा गोंधळ होतो. त्यामुळे परीक्षा सलगपणे झाली तर विद्यार्थ्यांना देखील सोयीचे होणार आहे.
एकसलग सुट्यांमुळे बाहेरगावी राहणारे विद्यार्थी व प्राध्यापकांना दिवाळीत गावी जाण्यासाठी प्रवासाचे नियोजन करता येणार आहे. त्यामुळे विद्यार्थी व प्राध्यापक दोन्हींना सोयीचे होईल अशा पद्धतीने विद्यापीठाने सुट्ट्यांचे नियोजन करावे, असे निवेदन विद्यापीठाचे प्र. कलगुरू डॉ. प्रा. एस. टी. इंगळे यांना संघटनेच्या वतीने देण्यात आले.
निवेदन देताना व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा. डॉ. शिवाजीराव पाटील, डॉ. भगवान चौधरी, प्राचार्य डॉ. एस. आर. पाटील, प्रा. डॉ. अमृत वळवी, प्रा. डॉ. सुरेश शेलार, प्रा. डॉ. नितीन बडगुजर आदी उपस्थित होते.