जळगाव : रुग्ण म्हणून आलेल्या दोघांनी रिव्हॉल्वरचा धाक दाखवून डॉ.महेंद्र मधुकर पाटील (३९, रा.शिवराम नगर, जळगाव) गळ्यातील दहा ग्रॅम वजनाची ४० हजार रुपये किमतीची सोनसाखळी लांबविल्याची घटना शनिवारी रात्री पावणे दहा वाजता दीक्षितवाडीतील अथर्व हॉस्पिटलमध्ये घडली.याप्रकरणी मध्यरात्री १ वाजता जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.डॉ.महेंद्र पाटील यांचा दिक्षितवाडीत दवाखाना आहे. शनिवारीरात्री रुग्ण तपासणी करीत असताना ९.४५ वाजता तोंडाला रुमाल बांधून २० ते २२ वयोगटातील एक रुग्ण कॅबिनमध्ये आला. मला खाज येते आहे असे डॉक्टरांना सांगितले असता डॉक्टरांनी तोंडाचा रुमाल काढायला लावला, त्याने किंचितसा रुमाल काढला तेव्हा त्याच्या मागे आणखी एक तरुण आला व थेट डॉक्टरांच्या डोक्याला रिव्हॉल्वर लावला. त्यावेळी रुग्ण म्हणून आलेल्या तरुणाने गळ्यातील सोनसाखळी ओढली.दोघंही कॅबिनच्या बाहेर निघाले. आरडाओरड करायला सुरुवात केली असता बाहेर दोन जण थांबले होते, त्यांनी कंपाऊडर गोपाळ भास्कर सोनवणे यालाही पकडून ठेवले होते आणि ओरडला तर मारुन टाकेन अशी धमकी दिली होती. रस्त्यावर लावलेल्या दुचाकीवरुन चारही जण पळून गेले.एक संशयित दहा वर्षापूर्वीचा रुग्णडॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला रुग्ण म्हणून तोंडाला रुमाल बांधून आलेला तरुण दहा वर्षापूर्र्वीही रुग्ण म्हणून आला होता. दरम्यान, या घटनेनंतर घाबरलेले डॉ.महेंद्र पाटील यांनी त्यांचे मित्र डॉ.धनराज चौधरी, डॉ.जितेंद्र विसपुते व डॉ.कुणाल नारखेडे यांना दवाखान्यात बोलावून घेत घडल्या प्रकाराची माहिती दिली. या डॉक्टरांनी लागलीच तेथून जिल्हा पेठ पोलीस स्टेशन गाठून निरीक्षक अकबर पटेल यांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ व परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यानंतर रात्री १ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला.
रिव्हॉल्वरचा धाक दाखवून दीक्षितवाडीत डॉक्टरला लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2020 9:59 PM