अमळनेर : गणेशोत्सवात डीजे वाद्यास सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली असल्याने कोणत्याही परिस्थितीत डीजेला परवानगी मिळणार नसून गणेश मंडळांनी धर्मदाय आयुक्तांकडून नोंदणी, वीज पुरवठा व जागा परवानगी, विसर्जन मिरवणूक आणि ध्वनिक्षेपक परवानगी आदी बाबी पूर्ण करावयाच्या आहेत, असे आवाहन अप्पर पोलिस अधीक्षक सचिन गोरे यांनी शांतता कमिटीच्या बैठकीत बोलताना केले.वेळेच्या आत विसर्जन करावे, अफवा पसरवू नये, काहीही विपरीत आढळल्यास पोलिसांना कळवावे आदी सूचना गोरे यांनी यावेळी दिल्या.गणेशोत्सव आणि मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर शांतता कमिटीची बैठक छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात पार पडली. सदर बैठकीत मंचावर आमदार शिरीष चौधरी, आमदार स्मिता वाघ, माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील, तहसीलदार ज्योती देवरे, डीवायएसपी राजेंद्र ससाणे, पोलीस निरीक्षक अंबादास मोरे, उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड, माजी नगराध्यक्ष सुभाष चौधरी, मंगळग्रह संस्थानचे अध्यक्ष दिगंबर महाले, नगरपालिका गटनेते प्रवीण पाठक, महिला दक्षता समितीच्या प्रा. शीला पाटील, फयाज शेख, अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन राजपूत उपस्थित होते.