~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
रावेर : तालुक्यातील खानापूर येथील एका २६ वर्षीय विवाहितेचा गुरुवारी पुत्ररत्न झाल्यानंतर मृत्यू झाला. अचानक रक्तदाब कमी होऊन अव्याहतपणे सुरू झालेला अतिरक्तस्त्राव नियंत्रित न झाल्याने शुक्रवारी पहाटे पावणेदोन वाजेच्या सुमारास या विवाहितेला जगाचा निरोप घ्यावा लागला. या दुर्दैवी घटनेने सारा गाव हळहळला. या गृहलक्ष्मीला साश्रुनयनांनी निरोप देताना संत श्री ज्ञानेश्वरी पारायणही नि:शब्द झाले होते.
या हृदयद्रावक घटनेबाबत वृत्त असे की, तालुक्यातील खानापूर येथील सामाजिक कार्यकर्ते गणेश राजाराम वाघ व यांचे सामान्य परिस्थितीत उदरनिर्वाह करणारे कुटुंब. त्यांचा थोरला मुलगा प्रमोद याचा विवाह लोधीपुरा (ता. जि. बऱ्हाणपूर, मध्यप्रदेश) येथील बाळू महाजन यांची कन्या माधुरी हिच्याशी सात वर्षांपूर्वी झाला होता. दरम्यान, त्यांच्या संसारवेलीवर प्रणाली हे कन्यारत्न बहरले.
दरम्यान, पहिली मुलगी झाली म्हणून आता पुत्ररत्नाची अपेक्षा उराशी बाळगून नऊ महिन्यांच्या मरणयातना सोसून विवाहिता माधुरी हिची गुरुवारी दुपारी पावणेबारा वाजता रावेरला एका खासगी रुग्णालयात दुसरी प्रसूती झाली. गुरुवारी तिने जणुकाही दत्तरूपी पुत्ररत्नाला जन्म दिला. त्यामुळे माहेरी व सासरी आनंदाची लहर बहरत असतांना क्रूर काळाची दुष्ट नजर लागली. प्रसूत झालेल्या विवाहिता माधुरीचा रक्तदाब अचानक कमी होऊन प्रसूतीपश्चात होणाऱ्या अतिरक्तस्त्रावावर नियंत्रण मिळवणे डॉक्टरांना दुरापास्त झाल्याने त्यांनी या विवाहितेला तातडीने जळगावला हलविण्याचा सल्ला दिला. दरम्यान, सावदा येथील दीर्घानुभव असलेल्या स्त्रीरोग व प्रसूतीतज्ज्ञांकडे तातडीचे औषधोपचारासाठी प्रयत्न केले. मात्र क्रूर नियतीला ते मान्य नसल्याने प्रसूतीपश्चात होणाऱ्या रक्तस्त्रावावर नियंत्रण मिळवणे दुरापास्त ठरल्याने डॉक्टरांनी अत्यवस्थेत जळगावला हलवण्याचा सल्ला दिला.
पती, मामा, आई व सासू यांनी रुग्णवाहिकेत अत्यवस्थेत घेऊन चाललेल्या प्रसूत विवाहितेची गंभीर होत चाललेली प्रकृती पाहता साकेगावनजीकच्या डॉ. उल्हासराव पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला. या विवाहितेची अत्यावस्था पाहून संबंधित डॉक्टरांनी तिला व्हेंटिलेटरवर घेऊन औषधोपचार सुरू केले. रक्तस्त्रावावर नियंत्रण मिळवण्यात रात्री उशिरा यश आले, मात्र रक्तदाब घटकागणिक कमी कमी होऊ लागल्याने शुक्रवारी पूर्वरात्री दोन वाजेच्या सुमारास तिची प्राणज्योत मालवली.
एकीकडे पुत्ररत्नामुळे झालेला आनंद व त्यावर विरजण टाकणाऱ्या विवाहितेच्या अकाली मृत्युमुळे सारा गाव व परिसर शोकाकुल झाला. मयत विवाहिता व जन्मत:च मातेच्या ममत्वाला मुकलेले सुखरूप बाळाला खानापूरला पहाटे आणले असता उपस्थित जनसागराने अश्रूंना वाट मोकळी करून दिली. तर येथील ज्ञानेश्वरीचे पारायणही अंत्ययात्रेमुळे थांबविण्यात आले होते.