जळगाव : जळगाव शहरासह जिल्ह्यात वाढत्या कोरोनाच्या नियंत्रणासाठी प्रशासनाकडून उपाययोजनांना वेग आला असून दररोज जेवढे रुग्ण आढळतील त्याच्या २० पट चाचण्या करा, असे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी यंत्रणांना दिले आहे. जिल्ह्यात वाढती रुग्णसंख्या चिंतेची बाब ठरत असून यावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासन ॲक्शन मोडवर असून शनिवारी सुट्टी असली तरी जिल्हाधिकाऱ्यांसह आरोग्य यंत्रणांच्या बैठका, व्हीसीचे सत्र सुरू होते. यावरून जिल्ह्यातील कोरोनाची वाढती स्थिती लक्षात येत आहे.
गेल्या दोन आठवड्यांपासून कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढून रुग्ण संख्या दररोज १००च्या पुढे जात आहे. शिवाय बाधितांचे प्रमाण वाढले आहे. यात बुधवारी महापालिकेत जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेत सूचना दिल्या. मात्र नागरिकांकडूनही नियमांचे पालन होत नसल्याने प्रशासनाकडून कारवाईचेही अस्त्र उगारले जात आहे. जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक, मनपा आयुक्त, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता, जिल्हा शल्य चिकित्सक, सर्व उपविभागीय दंडाधिकारी, कार्यकारी दंडाधिकारी, गटविकास अधिकारी, प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी, नगरपालिका, नगरपंचायत मुख्याधिकारी यांना पत्र देऊन उपाययोजनांविषयी सूचना दिल्या आहेत. यामध्ये महत्त्वांच्या मुद्यांबाबत कार्यवाही करून अहवाल सादर करण्याच्याही सूचना दिल्या आहेत.
नियमांचे पालन होत नसल्यास संस्था जबाबदार
लग्नसमारंभ, अंत्ययात्रा व इतर कार्यक्रमांसाठीदेखील काही नियमावली ठरवून दिली आहे. तरीदेखील त्या ठिकाणी गर्दी होत असल्याने आता मंगल कार्यालय, सामाजिक कार्यक्रमांचे ठिकाण, हॉटेल्स व इतर गर्दीच्या ठिकाणी मार्गदर्शक सूचनांचे पालन होणे आवश्यक आहे. यात विनामास्क कोणीही असायला नको, तसेच या ठिकाणी व कार्यक्रमाची परवानगी ज्या संस्थेला दिली असेल त्या ठिकाणी सूचनांचे पालन झाले नाही तर याची जबाबदारी संबंधित संस्थेवर राहणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात म्हटले आहे.
उपाययोजनांसाठी दिलेल्या सूचना
- रुग्णसंख्येच्या गरजेनुसार कोविड केअर सेंटर, कोविड हेल्थ सेंटर, कोरोना रुग्णालयत सुरू ठेवण्यात यावे.
- नियमानुसार उपचार करण्यात यावे.
- संपर्कात आलेल्या २० ते ३० जणांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करून २४ तासात त्यांच्याशी संपर्क साधत लक्षणे असल्यास संबंधितांच्या तपासण्या करा
- रक्तचाचण्या व छातीचे सिटीस्कॅन केलेल्या रुग्णांची आरटीपीसीआर चाचणी करावी.
- आयसीयू मॅनेजमेंटबाबत गरजेनुसार राज्यस्तरीय प्रशिक्षण दोन दिवसात होणार. डॉक्टर, स्टाफ, नर्सेस यांना प्रशिक्षण देण्यात यावे.
- नाशिक विभागातील पाच टक्के पॉझिटिव्ह रुग्णांचे नमुन्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सकांना कामकाज करावे.
- व्हेंटिलेटर कार्यान्वित असावे.
- कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांचा आढावा घेऊन आढळलेल्या त्रुटी दूर कराव्यात.
- सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांच्या बाबतीत होम आयसोलेशनचे सक्तीने पालन करावे
- १०० टक्के लसीकरणासाठी नियोजन करा, त्याची माहिती ॲपवर अपलोड करावी.
- नियमित लसीकरणही सुरू ठेवावे.
- सरकारी अथवा खासगी रुग्णालयात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यास त्याची माहिती तत्काळ यंत्रणेला द्या
- आपापल्या कार्यक्षेत्रातील सर्व सार्वजनिक प्रशासन गृहे, बस थांबे, रेल्वे स्टेशन व इतर व गर्दीची ठिकाणांचे सॅनिटायझेशन नियमितपणे करण्याविषयी स्थानिक स्वराज्य संस्थांना बंधनकारन करण्यात यावे.
- रुग्णसंख्या वाढत असल्यास गरजेनुसार कण्टेनमेंट झोन करण्यात यावे. यामध्ये पोलीस बंदोबस्त ठेवावा.