जळगाव : कोरोनो विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ परिसर, संलग्नित महाविद्यालये व परिसंस्था येत्या ३१ मार्चपर्यंत संपूर्णत: बंद ठेवण्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनाने घेतला आहे. या काळात सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी मुख्यालय न सोडता घरी बसूनच आवश्यक असेल ती कार्यालयीन कामे करावीत, असे निर्देश देण्यात आले आहे.प्रभारी कुलसचिव प्रा.बी.व्ही.पवार यांनी सोमवार परिपत्रक काढले असून त्यामध्ये ३१ मार्च पर्यंत शिक्षक, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घरी राहून काम करावे असे नमूद करण्यात आले आहे. शिक्षक व संशोधकांनी आॅनलाइन कन्टेंट विकसित करावे, आॅनलाइन अध्यापन व मुल्यमापन, पुढील शैक्षणिक वषार्साठी शैक्षणिक साहित्य तयार करणे, संशोधन लेखासंदर्भात कार्यवाही करणे, प्रश्नसंच तयार करणे, नाविन्यपूर्ण प्रकल्प तयार करणे आदीसाठी हा काळ उपयोगात आणावा. विद्यापीठ परिसरात कोणत्याही कार्यक्रमांचे आयोजन करु नये, असे या परिपत्रकात नमूद करण्यात आले असून अत्यावश्यक सेवा यातून वगळण्यात आल्या आहेत. संलग्नित महाविद्यालयाच्या शिक्षक व कर्मचाऱ्यांनी देखील घरी राहून काम करावे, असे या परिपत्रकात म्हटले आहे. महाराष्ट्र शासन, उच्च व तंत्र विभाग, विद्यापीठ अनुदान आयोग, मनुष्यबळ विकास मंत्रालय, नवी दिल्ली आणि सहसंचालक, उच्च शिक्षण,पुणे यांच्या संदर्भाने हे परिपत्रक काढण्यात आले आहे.
घरी बसूनचं करा, कार्यालयीन कामे !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2020 7:55 PM