लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : आमदार सुरेश भोळे दररोज नवनवीन आरोप करत असून, सागरपार्क व जमिनीच्या काही व्यवहारांबाबत आमदारांनी वकिलांची नार्कोटेस्ट करण्याची मागणी केली होती. मात्र, या प्रकरणांसह वॉटरग्रेस, एलईडीसह सात वर्षांची कुंडली बाहेर आणण्यासाठी सर्वात आधी आमदार सुरेश भोळे यांची नार्कोटेस्ट करण्याची मागणी शिवसेनेच्या नगरसेवकांनी केली आहे.
मनपा विरोधी पक्षनेत्यांचा दालनात मंगळवारी शिवसेनेच्या नगरसेवकांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी गटनेते अनंत जोशी, नगरसेवक नितीन बरडे व प्रशांत नाईक आदी उपस्थित होते. या पत्रकार परिषदेत तीन्ही नगरसेवकांनी आमदार सुरेश भोळे यांच्यावर निशाना साधला. सागरपार्कची जागा महापालिकेने न्यायालयीन लढ्यानंतर जिंकली होती. मात्र, आमदार भोळे यांनी हा मुद्दा उपस्थित करून, पुन्हा काहीही गरज नसताना हा विषय चर्चेला आणला आहे. आमदार भोळे यांनीच सागरपार्कचा विकास थांबविण्यासाठी प्रयत्न केल्याचा आरोप नितीन बरडे यांनी केला.
सागरपार्कचे काम थांबविण्यासाठी आमदारांनी मनपावर दबाव टाकला
सागर पार्कच्या विकासासाठी ५९ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला होता. मात्र, हे काम थांबविण्यासाठी आमदार भोळे मनपा अभियंता सुनील भोळे यांच्यावर दबाव टाकून हे काम थांबविण्याचा सूचना दिल्याचा आरोप शिवसेनेचे गटनेते अनंत जोशी यांनी केला. आमदार भोळे यांचे सागरपार्क व जळगाव शहराबाबत असलेले प्रेम हे पुतना मावशीचे प्रेम असल्याचाही आरोप अनंत जोशी यांनी केला.
वॉटरग्रेसचा मक्ता भाजपची देन
वॉटरग्रेसचा मक्ता खाविआचा काळात आणण्यात आल्याचे आमदार भोळे यांनी सांगितले होते. मात्र, आमदार यांच्या पत्नी सीमा भोळे या महापौर असताना या ठेक्याला महासभेत बहूमताने भाजपाने मंजुरी दिली आहे. तसेच शिवसेनेने महासभेत या मक्त्याला जाहीर विरोध नोंदविला असल्याचे जोशी यांनी सांगितले. आमदार भोळे यांनी केवळ शहराच्या विकासाची कामे मंत्रालयात जावून थांबविण्याचे कामे केली असून, त्यांची नार्कोटेस्ट करण्याची गरज असल्याचेही अनंत जोशीे यांनी सांगितले. वॉटरग्रेसबाबत मनपाची फसवणूक झाल्याचे नितीन बरडे यांनी सांगितले.
----