जळगाव: सहकारी बँकांवरही संचालक म्हणून सरकारी माणूस येत असेल तर याचा अर्थ आपली विश्वासार्हता कमी झाली. त्यामुळे सहकारातील विश्वासार्हता संपू देऊ नका, असे आवाहन विधानसभेचे माजी अध्यक्ष अरूणभाई गुजराथी यांनी केले. जिल्हा अर्बन को-आॅपरेटीव्ह बँक्स असोसिएशनतर्फे बुधवारी जळगावात मेळाव्याचे आयोजन केले होते. त्याच्या उद्घाटनानंतर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जळगाव जनता बँकेचे माजी अध्यक्ष व सहकार भारतीचे अखिल भारतीय बँक प्रकोष्ठ प्रमुख संजय बिर्ला होते.अरूणभाई म्हणाले, बँक चालविणे सोपे नाही. ठेवी वाढल्या तरी चिंता वाढते. कर्ज द्यायचे कुणाला? चांगला कर्जदार मिळाला पाहिजे. त्याची परतफेडीची वृत्ती पाहिजे. त्यासाठी कर्जदारांची मानसिकता बदलण्यासाठीही प्रयत्न करण्याची गरज आहे. ज्याला पत नाही. त्याला कर्ज द्या आणि बँकेची पत कमी होणार नाही, याची काळजी घ्या. ज्यांच्यावर निसर्गानेच अन्याय केला आहे. अशा अपंगांना कर्जाच्या व्याजाच्या दरात अर्धा टक्का सवलत देऊन त्याला न्याय देण्याचे कार्य सहकारी बँका करू शकतात. जे कुठेही घडत नाही, त्याची सुरूवात जळगाव पासून करा, असे आवाहनही त्यांनी केले.
सहकारातील विश्वासार्हता संपू देऊ नका - अरूणभाई गुजराथी यांचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 12:12 PM