पारोळा : शहरात नागरिकांना विश्वासात न घेता संपूर्ण मीटर बदलविण्यात आले. वीज ग्रहकांना अवाची सव्वा बिले देण्यात आली. याबाबत अपविभागीय अभियंता यांना निवेदन देण्यात आले.वीजवापर कमी असूनदेखील सर्वसामान्यांना न परवडणारी अशी बिले महावितरणने दिली आहेत. त्यामुळे ज्यांना वाढीव बिले आली आहेत त्या सर्वांना मीटर बदलून द्यावे, अशी मागणी करण्यात आली. याबाबत वीज वितरण कंपनीचे येथील उपविभागीय अभियंता अनिल वडे यांना निवेदन दिले. यावेळी सर्व बिले तपासून त्यात त्रुटी आढळून आल्यास बिले कमी करून मीटर बदलुन दिली जातील, असे आश्वासन कार्यकारी अभियंता वडे यांनी दिले.शहरात गेल्या महिन्यात संपूर्ण शहराचे वीज मीटर बदलविण्याची मोहीम राबविण्यात आली. मीटर तपासून न पाहता सरसकट बदलविण्यात आली. यामुळे अनेकांना दुपटीने बिले आली. नागरिकांना यामुळे अर्थिक भुर्दंंड बसला आहे. बिल कमी करण्यासाठी नागरिकांनी वीज वितरणच्या शहर आणि अमळनेर रोडवरील मुख्य कार्यालयात अनेकवेळा मागणी केली. मात्र, त्यांना उडवाउडवीची उत्तरे मिळाली. कित्येक वेळा मागील बिले व जास्तीची तफावत असलेले बिल अधिकारी, कर्मचा़ऱ्यांना दाखविण्यात आली. पण, त्याचाही सकारात्मक परिणाम झाला नाही. त्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत. बालाजी मंदिराच्या परिसरात एकत्रितपणे ८७६ वीज ग्राहकांनी बिलाच्या प्रती जमा केल्या. पाटील यांनी सर्व बिले एकत्रित करून ती अभियंता वडे यांना भेट दिली.या वेळी अभियंता वडे यांनी ही बिले तपासून वाढीव इंधन भार तपासला जाईल. त्याचप्रमाणे प्रत्येक मीटरदेखील तपासले जाईल. त्यात कोणतीही त्रुटी आदळून आल्यास तत्काळ वीजबिल कमी करून दिले जाईल. आवश्यकतेनुसार मीटरही बदलून दिले जाईल, असे आश्वासन कार्यकारी अभियंता अनिल वडे यांनी दिले. यावेळी छावाचे ईश्वर पाटील, विकास सोनवणे आदी उपस्थित होते.
वाढीव बिले नको, मीटर बदलून द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2019 9:26 PM