बी. एस. चौधरी / ऑनलाइन लोकमतएरंडोल, जि. जळगाव, दि. 13 - माया व प्रेम देऊन आपल्या पंखांच्या आभाळाखाली आई आपल्या पिलांना आकाश खुले करून देते. ते आकाशात घिरटय़ा घालणा:या घारीच्या पिलांकडे पाहून जाणवते. असेच काहीसे घडते ते माणसाच्या आयुष्यात. अचानक वादळ येते आणि मोठय़ा मेहनतीने झाडावर बांधलेले घरटे खाली पडावे आणि आपल्या पिलांना पंखात घेऊन आभाळात उडण्याचे बळ द्यावे. हे बळ देण्याचे सामथ्र्य फक्त आईकडेच असते. याची प्रचिती एरंडोल येथील औषधी विक्रेत्या मीना अरुण पवार यांच्या उदाहरणावरून येते. त्यांचे पती अरुण नवल पवार हे अॅप्लाइड अॅनिमिया (कॅन्सर)ने आजारी पडले. त्यांना मुंबई येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले. रुग्णालयात थांबून त्यांनी जवळपास तीन महिने त्यांची सेवा केली. डॉक्टरांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतरही काळाने क्रूरता दाखविली व त्यांना हिरावून नेले. त्यामुळे मीनाताईला एकटेपणाचे जीवन कंठण्याची वेळ आली. त्या वेळी त्यांना चेतना व अश्विनी ह्या दोन लहान मुली होत्या. त्यांच्या आधारस्तंभाचे काम त्यांनी केले. त्यांनी डी फॉर्मसीचे शिक्षण पूर्ण केले होते. वैधव्याच्या काळात त्यांच्यावर त्यांच्या दोन्ही मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी पडली. त्यांचे बारावीर्पयतचे शिक्षण झाल्यानंतर स्वत: मीनाताईसुद्धा एम.ए.(मराठी) झाल्या. त्यांचे वडील सेवानिवृत्त प्राचार्य यशवंत पाटील यांचे त्यांना मार्गदर्शन मिळाले. 1985 मध्ये त्यांनी छोटेसे औषधी दुकान सुरू करून स्वावलंबनाच्या दिशेने वाटचाल केली. त्या एरंडोल तालुक्यातील पहिल्या महिला उद्योजिका आहेत. औषधी दुकानाचे काम पाहून त्यांनी दोन्ही मुलींचे डी फॉर्मसीचे शिक्षण पूर्ण करण्यात यश मिळविले.योग्यवेळी चेतना व अश्विनीसाठी योग्य अशी स्थळे आली. बोरिवली येथील मयूर वसंतराव पाटील यांच्याशी चेतनाचा विवाह झाला, तर पनवेल येथील उद्योजक वीरेंद्र देवीदास डोके यांच्याशी अश्विनीचा विवाह झाला. दोघी कन्या प्रपंचात रमल्या आहेत.मीनाताई आजही औषधी दुकान चालवतात. काही महिन्यांपूर्वी त्यांना जळगाव जिल्हा मेडिकल असोसिएशनतर्फे ‘बेस्ट फार्मासिस्ट अवॉर्ड’ बहाल करण्यात आला. विशेष हे की, मीना पवार यांनी आपल्या दोघी कन्यांना स्वावलंबी होण्याइतपत शिक्षण दिले व त्यांना आर्थिकदृष्टय़ा स्वत:च्या पायावर उभे केले. स्वत: त्या स्वावलंबी जीवन जगत असून त्यांनी स्वावलंबनाचे आदर्श उदाहरण समाजापुढे ठेवले आहे. ऐन तारुण्यात आलेल्या वैधव्यावर त्यांनी मात करून त्यांच्या दोन्ही मुलींचा संसार उभारण्यासाठी अपार परिश्रम केले आहेत.
हिंमत न हरता मुलींनाही केले स्वावलंबी
By admin | Published: May 14, 2017 7:31 PM